प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मागील महिन्यात शाळा बंदचे संकट ओढवले होते. दरम्यान, पुन्हा शाळा सुरू झाल्यानंतर शहरातील चार शाळांतील विद्यार्थी कोरोनाग्रस्त आढळल्याने त्या शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्या आता सुरू करण्यात आल्या आहेत. तर ग्रामीण भागातील केवळ एक शाळा बंद आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पाचहून अधिक विद्यार्थी कोरोनाग्रस्त झाल्यास शाळा बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला होता. शहरातील चार शाळांमध्ये 10 हून अधिक विद्यार्थी कोरोनाग्रस्त आढळल्याने त्या शाळा बंद करण्यात आल्या होत्या. गुरुवार आणि शुक्रवारपासून त्या चारही शाळा सुरू करण्यात आल्याची माहिती शहर क्षेत्रशिक्षणाधिकारी बजंत्री यांनी दिली.
ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थी कोरोनाग्रस्त होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. केवळ उचगाव येथील एका शाळेत पाचपेक्षा अधिक विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्याने ती शाळा बंद करण्यात आली होती. ती सोमवार दि. 7 पासून सुरु होणार आहे, अशी माहिती ए. बी. जुटन्नावर यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली. एकंदर जिल्हय़ातील शाळांमध्ये पुन्हा एकदा उत्साह संचारला आहे. तरीही दक्षता घेण्याची सूचना मुख्याध्यापक आणि शिक्षकांना देण्यात आली आहे.
बॉक्स
पालकांत भीती कायम
बेळगाव शहर आणि ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची हजेरी समाधानकारक आहे. पण प्रत्येक शाळेत विद्यार्थी कोरोनाग्रस्त होत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. विद्यार्थी मात्र शाळा सुरू झाल्याने समाधानी आहेत.