बेळगाव / प्रतिनिधी
संपूर्ण देश पोलिओमुक्त करण्यासाठी दोन टप्प्यात पल्स पोलिओ कार्यक्रम राबविण्यात येतो. पल्स पोलिओ लसिकरण मोहीम रविवारी शहरातील विविध भागात राबविण्यात आली. या दरम्यान पाच वर्षे वयोगटातील बालकांनी पोलिओ डोस पाजण्यात आले. शहरातील रूग्णालये, बसस्थानके, बाजारपेठ अशा विविध ठिकाणी ही मोहीम यशस्वी करण्यात आली.
जिल्हा आरोग्य खाते, महापालिका आणि विविध संस्थांच्या माध्यमातून पल्स पोलिओ मोहीम यशस्वी करण्यात आली. रविवारी सकाळी 7 पासून या मोहीमेस प्रारंभ करण्यात आला. जिल्हा रूग्णालय, नगर आरोग्य केंद्र आणि महापालिकेच्या विविध कार्यालयात, शाळा, मंदिर, मस्जीद, सार्वजनिक ठिकाणी, मध्यवर्ती बसस्थानक व गर्दी असलेल्या बस स्थानकाच्या आवारात लसीकरण केंदे स्थापन करण्यात आली होती. यावेळी 5 वर्षाखाली बालकांना आरोग्य खात्याच्या वतीने लस देण्यात आली.
पालकांना काही कारणास्तव आपल्या बालकांना डोस पाजण्याचे जमले नसल्यास तसेच भटकेलोक व रोजंदारीवर जाणाऱया मजुरांच्या मुलांसाठी आरोग्य विभागाच्या वतीने व अंगणवाडी कर्मचाऱयांकरवी लस देण्यात येणार आहे. लसीकरणाची मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य खात्याचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, अगणवाडी कर्मचारी, महापालिकेच्या कर्मचाऱयांनी परिश्रम घेतले.