दिंडी, भजनासह टाळ मृदुंगाचा गजर
प्रतिनिधी /बेळगाव
शहर परिसरात सोमवारी कार्तिक एकादशी भक्तीभावाने साजरी करण्यात आली. शहरातील विविध विठ्ठल मंदिरातून पहाटे काकड आरती, अभिषेक, पुजा, भजन, आरती व इतर कार्यक्रम झाले. टाळ मृदंगाचा गजर करत भक्तीमय वातावरणात एकादशीचा सोहळा झाला. एकादशी निमित्त धार्मिक कार्यक्रमाबरोबर परंपरा जपत दिंडीचेही आयोजन करण्यात आले होते.
शहरातील महाद्वाररोड येथील ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल रखुमाई मंदिर, खडेबाजार येथील विठ्ठल मंदिर, नामदेव देवकी संस्थेचे विठ्ठल मंदिर, बापटगल्ली येथील विठ्ठल मंदिर, शहापूर येथील विठ्ठल मंदिर आदी मंदिरातून एकादशी निमित्त कार्यक्रम झाले.
महाद्वाररोड तिसरा क्रॉस येथील विठ्ठल रखुमाई मंदिरतर्फे दिंडी
महाद्वाररोड तिसरा क्रॉस येथील ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल रखुमाई मंदिरतर्फे पारंपारिक पद्धतीने दिंडी काढण्यात आली. महाद्वाररोड येथून दिंडीला प्रारंभ करून कपिलेश्वर मंदिरात सांगता करण्यात आली. यावेळी दत्तू जट्टेवाडकर, जयवंत कोंडूस्कर, बाळू पाटील, प्रभाकर सांबरेकर, पांडु जाधव, राजू पवार यासह वारकरी भक्त उपस्थित होते.
कोरोनामुळे मागील दोन आषाढी एकादशी आणि एक कार्तिकी वारीला वारकऱयांना मुकावे लागले आहे. यंदा कार्तिकी वारीसाठी महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे वारकरी पंढरपुरकडे रवाना झाले आहेत. कार्तिकी एकादशीनिमित्त शहरासह ग्रामीण भागातील विविध मंदिरातून जागर भजन आणि किर्तन झाले. तर काही ठिकाणी पहाटे हरिपाठ व रात्री किर्तनाचा सोहळा देखील रंगला.
विठ्ठल मंदिरमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम
बापट गल्ली येथील कार पार्किंगमधील विठ्ठल मंदिरमध्ये कार्तिक एकादशीनिमित्त अभिषेक व आरतीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून रेणू सुहास किल्लेकर व शिवाजी विश्वास हंगीरगेकर दांपत्य उपस्थित होते. या दांपत्यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी यांना अभिषेक घालून काकडारती करण्यात आली.
याप्रसंगी सांप्रदाय मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत सांबरेकर यांनी शिवाजी हंगीरगेकर यांच्या सत्कार केला. अशोक पोतदार यांनी रेणू किल्लेकर यांच्या सत्कार केला. यावेळी मंडळाचे सदस्य प्रभाकर कणबर्गी, पांडुरंग पाटील, राजू पवार, शिवराज गवाणे, रोहन मिसाळ, महेश पावले, रामचंद्र निकम, गणपत चौगुले, उदय पाटील, राम जाधव, मधू कणबरकर, सदाशिव हिरेमठ, केसरकर पंच व शेकडो महिला भक्त उपस्थित होत्या.