कोरोना रुग्ण सापडल्याने घेतला निर्णय, गोवावेस येथे भरावे लागणार विजबिल
प्रतिनिधी/ बेळगाव
शहापूर पोलिस स्टेशनसमोरील हेस्कॉम कार्यालयाच्या शेजारी कोरोनाचे रुग्ण सापडल्याने हे कार्यालय काही दिवसांसाठी इतरत्र हलविण्यात आले आहे. 1 ऑगस्टपर्यंत हे कार्यालय गोवावेस येथील हेस्कॉम कार्यालयात सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना गोवावेस येथील कार्यालयात विजेचे बिल भरावे लागणार आहे.
शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याचा फटका नागरिकांना बसू लागला आहे. एखादा कोरोना रुग्ण सापडल्यास त्या परिसरातील सर्व दुकाने, कार्यालये बंद करावी लागत आहेत. शहापूर येथे कोरोना रुग्ण सापडल्याने हेस्कॉमने बिल भरणा केंद्र (एटीपी सेंटर) हलविण्याचा निर्णय घेतला. बिल भरण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेवून हा निर्णय घेण्यात आला.
नागरिकांची फेरी वाढणार
वडगाव व शहापूर येथील नागरिक पोलिस स्टेशनसमोरील बिल भरणा केंद्रामध्ये जावून बिल भरत असतात. परंतु सध्या ते बंद असल्याने नागरिकांना गोवावेस पर्यंतचा प्रवास करावा लागणार आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होणार आहे.
कार्यालय तात्पुरते हलविले : विनोद करूर
शहापूर हेस्कॉम कार्यालयाशेजारी कोरोना रुग्ण सापडल्याने कार्यालय तात्पुरते हलविण्यात आले आहे. 1 ऑगस्टपर्यंत शहापूर व वडगाव येथील नागरिकांनी गोवावेस पेट्रोलपंपाच्या मागील बाजूस असणाऱया हेस्कॉम कार्यालयात बिल भरावे, असे आवाहन हेस्कॉमचे साहाय्यक कार्यकारी अभियंता विनोद करूर यांनी केले आहे.