को रोना संसर्गामुळे सामान्य सर्दी खोकला झाले तरीही भीती वाटते आहे. वास्तविक, यावर घरगुती उपायही प्रभावी औषध ठरतात.
- सर्वांत पहिला उपाय म्हणजे कोमट पाण्यात मीठ, हळद घालून खळखळून गुळण्या करणे. घसा खवखवत असेल तर ज्येष्ठमधाचा वापर करू शकतो. आले आणि मध मिसळून त्याचे सेवन केल्यास खोकल्यामध्ये आराम पडतो. आले आणि मध हे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासही मदत करतात.
- खोकला, सर्दी आणि तापही असेल तर कोमट पाण्याचे नियमित सेवन करावे. गार पाणी पिऊ नये. आल्याच्या पाण्याचे सेवन करावे. तुळशीचे पाणी प्यावे. ज्येष्ठमधाचे पाणी प्यावे. तुळस, आले आणि मध एकत्र करून त्याचे पाणी घेता येऊ शकते. त्यामुळे आराम पडतो.
- ऋतू बदलाच्या काळात होणारे आजार होण्याचे एक मुख्य कारण म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता क्षीण होणे हे असते. त्यामुळे त्यासाठीही काही उपाय करता येतात. रोगप्रतिकारक्षमता कमी झाल्यास खोकला, सर्दी लवकर होते आणि ताप सतत येतो. हवेतील जरासा बदलही शरीरावर परिणाम करतो. शरीर अशक्त होते, वजन कमी असते, जेवलेले नीट पचत नाही. सतत बद्धकोष्ठता होते. पोट व्यवस्थित साफ होत नाही. भूक लागत नाही. ही सर्व लक्षणे तुमची इम्युनिटी वीक झाल्याचे दर्शवते.
- शरीर तंदुरूस्त राहाण्यासाठी आणि मजबूत होण्यासाठी रोज अर्धा तास व्यायाम करणे आवश्यक आहे. बाहेर फिरायला जाणे शक्य नाही त्यामुळे घरातच काही व्यायाम केला पाहिजे. योगअभ्यास करावा. घरच्या घरी जागेवर धावणे, दोरीच्या उडय़ा मारणे, नृत्य करणे आदी व्यायाम करू शकतो.
- शरीराची प्रतिकारक्षमता वाढण्यासाठी कोरफड आणि गुळवेल यांचा रस सेवन करावा. आवळ्याचा रस सेवन करावा. तसेच प्राणायाम करावा.