वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2023 च्या आयपीएल हंगामासाठी मुंबईचा अष्टपैलू शार्दुल ठाकुरला कोलकाता नाईट रायडर्स संघाने खरेदी केले आहे. गेल्या वषीच्या आयपीएल हंगामात ठाकुर दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करीत होता.
कोलकाता नाईट रायडर्सच्या फ्रँचायझीनी शार्दुल ठाकुर समवेत चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने या करारापोटी शार्दुल ठाकुरला मोठी रक्कम दिली असून रकमेचा आकडा गुपित ठेवण्यात आला आहे. न्यूझीलंडच्या दौऱयावर जाणाऱया भारताच्या वनडे संघामध्ये शार्दुल ठाकुरचा समावेश करण्यात आला आहे. न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील वनडे मालिका 18 नोव्हेंबरपासून खेळविली जाणार आहे. 2022 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी झालेल्या क्रिकेटपटूंच्या लिलावामध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या फ्रँचाईजीनी शार्दुल ठाकुरला 10.75 कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केले होते. शार्दुल ठाकुरने गेल्या आयपीएल हंगामात 14 सामन्यातून 15 गडी बाद केले होते. तर फलंदाजीत त्याने 120 धावा जमविल्या होत्या.
2023 च्या आयपीएल हंगामासाठी विविध संघांच्या फ्रँचाईजीनी आतापासूनच अव्वल देशी आणि विदेशी क्रिकेटपटूंना खरेदी करण्याकरता प्रयत्न सुरू ठेवले आहेत. गुजरात जायंट्सने वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनला मुक्त केल्याने कोलकाता नाईट रायडर्सच्या फ्रँचाईजीनी त्याला रविवारी खरेदी करण्याचा अंतिम निर्णय घेतला होता. त्याचप्रमाणे अफगाणचा यष्टीरक्षक आणि फलंदाज गुरबाज यालाही कोलकाता नाईट रायडर्सने खरेदी केले आहे. गुरबाज यापूर्वी गुजरात टायटन्स संघाचे प्रतिनिधित्व करीत होता. गेल्या वषीच्या आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सने 14 गुणांसह पाचवे स्थान मिळविले होते तर कोलकाता नाईट रायडर्सना चौदा सामन्यातून 12 गुणांसह सातवे स्थान मिळाले होते.