पहिली ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू झाल्याने आनंद,
प्रतिनिधी/ सातारा
शाळेची घंटा पुन्हा एकदा वाजली आहे, कारण मागील काही दिवसांपुर्वी कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ होत असल्याने शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. पण कोरोनाचा कहर ओसरत असल्याने जिल्हय़ातील शाळा पुन्हा एकदा सोमवार दि. 24 पासुन पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारी जिल्हय़ातील सर्वच शाळांच्या घंटा पुन्हा एकदा वाजल्या आहेत. शाळेचे गणवेश परिधान करून विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळांना हजेरी लावली होती. दरम्यान, पहिली ते 12 पर्यंतच्या शाळा सुरू झाल्या तरी कॉलेजबाबतचा अजूनही निर्णय झाला नाही. त्यामुळे शाळा सुरू झाल्या कॉलेज कधी सुरू करणार असा सवाल विद्यार्थी करू लागलेत.
जिल्हय़ातील शाळा पुन्हा एकदा सुरू झाल्याने शिक्षक, विद्यार्थी व पालकांच्या चेहऱयावर एकच आनंद दिसुन येत होता. जवळपास सर्वच पालकांनी आपापल्या पाल्यांना सोमवारी आवर्जुन शाळेत पाठविले होते. यामध्ये शिक्षण विभाग प्राथमिक, सातारा जिल्हा परिषद सातारा यांच्यातर्फे जिल्हय़ातील इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंत शाळांमध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक 2690 एकुण शाळांपैकी 2630 शाळा सुरू झाल्या. नगरपालिका प्राथमिक एकुण 142 पैकी 140 व खासगी प्राथमिक 258 पैकी 252, खासगी माध्यमिक 574 पैकी 552 व खासगी उच्चमाध्यमिक 140 पैकी 139 शाळा व महाविद्यालये सुरू करण्यात आले हेते.
त्यातच ऑनलाईन शिक्षण पध्दतीपेक्षा शाळेमध्ये प्रत्यक्षात जाऊन घेतलेले शिक्षण अत्त्यंत प्रभावी ठरत असल्याने शाळा सुरू करण्यात याव्यात असा अट्टहास अनेक पालकवर्गांकडुन करण्यात येत होता. त्यातच शासनाने ही राज्यातील संबंधित जिल्हा प्रशासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, असे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हय़ातील सर्वशाळा सोमवार पासुन सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पालकवर्गांमधुन ही समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोना बाबतच्या सर्व नियमांचे पालन
शाळा जरी सुरू करण्यात आल्या असल्यातरी शासनाने दिलेल्या कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालनही करण्यात आले होते. यामध्ये सर्वांनी मास्कचा व सॅनेटायझरचा नियमित वापर करणे. शाळेतील सर्व खोल्या सॅनेटाईझ करून घेणे. तसेच एका बेंचवर एकाच विद्यार्थ्याला बसविण्यात आले होते. याचबरोबर 15 वर्षावरील सर्व विद्यार्थ्यांना आवर्जुन लसीकरण करून घेण्याच्या सूचनाही शिक्षक वर्गाकडुन देण्यात येत होत्या.
पदवी महाविद्यालये ऑनलाईन
लसीकरणासाठी अद्याप ही पात्र नसलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन शिक्षण घेण्याची परवाणगी देण्यात आली आहे. पण ज्या विद्यार्थ्यांचे दोन्ही डोस घेऊन झालेले विद्यार्थी आहेत अशांना मात्र अद्यापही ऑनलाईन शिक्षण पध्दतीची सक्ती करण्यात येत आहे. सध्या अनेक अभियांत्रिकी, वैद्यकीय व पदवी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातुनच शिक्षण देण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम अत्त्यंत क्लिष्ट असातो, अनेकदा ऑनलाईन पध्दतीचे शिक्षण प्रभावी ठरत नाही. त्यामुळे आम्हालाही महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेण्याची परावानगी देण्यात यावी, अशी मागणी संबंधीत विद्यार्थ्यांकडुन धरण्यात येत आहे.