प्रतिनिधी / सातारा :
शाळेची घंटा पुन्हा एकदा वाजली आहे, कारण मागील काही दिवसांपुर्वी कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ होत असल्याने शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. पण कोरोनाचा कहर ओसरत असल्याने जिल्हय़ातील शाळा महाविद्यालये पुन्हा एकदा सोमवार दि. 24 पासुन पुर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारी जिल्हय़ातील सर्वच शाळांच्या घंटा पुन्हा एकदा वाजल्या आहेत. शाळेचे गणवेश परिधान करून विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळांना हजेरी लावली होती.
जिल्हय़ातील एकुण 3 हजार 833 शाळा व महाविद्यालयांचे आवार पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजलेले होते. यामध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा 2 हजार 691, इतर सर्व नगर पालिका, खासगी शाळा 1 हजार 142 शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. शाळा पुन्हा एकदा सुरू झाल्याने शिक्षक, विद्यार्थी व पालकांच्या चेहऱयावर एकच आनंद दिसुन येत होता. जवळपास सर्वच पालकांनी आपापल्या पाल्यांना सोमवारी आवर्जुन शाळेत पाठविले होते.
त्यातच ऑनलाईन शिक्षण पध्दतीपेक्षा शाळेमध्ये प्रत्यक्षात जाऊन घेतलेले शिक्षण अत्त्यंत प्रभावी ठरत असल्याने शाळा सुरू करण्यात याव्यात असा अट्टहास अनेक पालकवर्गांकडुन करण्यात येत होता. त्यातच शासनाने ही राज्यातील संबंधीत जिल्हा प्रशासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, असे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हय़ातील सर्वशाळा सोमवार पासुन सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पालकवर्गांमधुन ही समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन
सोमवार पासुन शाळा जरी सुरू करण्यात आल्या असल्यातरी शासनाने दिलेल्या कोरोना बाबतच्या सर्व नियमांचे काटेकोर पणे पालन ही करण्यात आले होते. यामध्ये सर्वांनी मास्कचा व सॅनेटायझरचा नियमित वापर करणे. शाळेतील सर्व खोल्या सॅनेटाईझ करून घेणे. तसेच एका बेंचवर एकाच विद्यार्थ्याला बसविण्यात आले होते. याचबरोबर 15 वर्षावरील सर्व विद्यार्थ्यांना आवर्जुन लसीकरण करून घेण्याच्या सुचना ही शिक्षक वर्गाकडुन देण्यात येत होत्या.