रस्त्यावरचा राडारोडा टाकून ओढा बुजवला, पावसाळय़ात संभावणार धोका, हद्दवाढ झाल्याने ओढे हडपण्याचे प्रकार सुरु
प्रतिनिधी / सातारा
दिवाळीनंतर 7 सप्टेंबर 2020 ला सातारा शहराची हद्दवाढ झाली आहे. त्यानंतर हद्दवाढीच्या भागात अनेकांनी मोकळय़ा जागा व ओढे हडपण्यास प्रारंभ केला आहे. असेच एका विकसकाने चक्क ओढय़ाला लागूनच रांगोळे कॉलनीत असलेली त्यांची जमिनीचे प्लॉटिंग सुरु केले आहे. त्यामध्ये त्यांनी रस्त्याकडेचा राडारोडा उचलून चक्क ओढय़ात टाकून सपाटीकरण करुन घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ओढय़ावर अतिक्रमण केल्यामुळे शाहुनगरात पालवी चौकात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते तशी परिस्थित शाहुपूरीत होण्याची शक्यता आहे. रस्त्याकडेचा राडारोडा कोणाच्या कृपेने उचलला गेला याचीच चर्चा सध्या रंगत आहे.
सातारा शहर हे डोंगर उतारावर वसलेले शहर आहे. या शहरातील अनेक ओढय़ावर अतिक्रमणे झालेली आहेत. वाय सी कॉलेज जवळून वाहणाऱया सुळाच्या ओढय़ावरुनही काही वर्षापूर्वी मोठा राडा झाला होता. त्यामुळे पावसाळय़ात ओढय़ावरील केलेल्या बांधकामाचे पडसाद दिसून येतात. अलिकडच्या पाच ते सात वर्षात शाहुनगरातील चेतना हॉटेलसमोर गोडोली तळय़ाच्या परिसरात ओढा तुंबून घराघरात पाणी शिरण्याचा प्रकार घडला होता. गतवर्षी 2020 च्या पहिल्या पावसात किल्ले अजिंक्यताऱयावरुन येणाऱया पावसाचे पाणी पालवी चौकात तुंबले गेले होते. कॉलन्या जलमय झालेल्या दिसत होत्या. तसाच प्रकार आता शाहुपूरीतील रांगोळे कॉलनीतल्या ओढय़ावर होण्याची शक्यता आहे. शंभू महादेव मंदिराच्या पाठीमागून आकाशवाणी झोपडपट्टीकडे जाणारा हा ओढा शाहुपूरीतील पाण्याच्या टाकीजवळील रस्त्यावरील राडारोडा गेल्या दोन दिवसांपासून जेसीबीने उचलून ट्रक्टरमध्ये आणि डंपरमध्ये भरुन ओढय़ात टाकून ओढय़ाची लेवल करुन घेतली गेली आहे. ओढय़ाची लेवल करुन घेतल्याने आता संबंधित विकसक प्लाटिंग पाडून विकसित करणार आहे. शहराची हद्दवाढ झाल्याने नव्याने हद्दीत आलेल्या भागामधील मोकळय़ा जागांवर अनेकांची नजर आहे. काहींनी आपल्या कामकाजांना सुरुवातही केली आहे. नुकत्याच नगररचना विभागाकडे 200 जणांनी बांधकाम परवाने घेण्याच्या फाईली प्रलंबित आहेत. तर एनएचे प्लॉटिंग करण्याचीही काही ठिकाणी गडबड सुरु आहे. त्यामुळे पालिकेकडूनही या ओढा गळफटणाऱयांवर नेमकी काय कारवाई होणार?, संबंधित विकसकाला कोणाचा वरदहस्त आहे याचीच चर्चा शाहुपूरीसह साताऱयात सुरु आहे.
आकाशवाणी झोपडपट्टीला होणार पावसाळय़ात धोका
आकाशवाणी झोपडपट्टी ज्या ओढय़ाच्या कडेला वसलेली आहे. त्याच ओढय़ाला बुजवून टाकण्याचे काम गेल्या दोन दिवसांपासून सुरु आहे. त्यामुळे त्याचे परिणाम लगेच जाणवणार नाहीत. संबंधित विकसक हा नकाशावर रस्ते आहेत, पाईपलाईन टाकून घेणार आहे असे सांगतो आहे परंतु पाईपा कुठे टाकण्याचे दिसत नाही. ओढा पुर्णपणे बुजवण्यात आल्याचे दिसत आहे.
जिल्हाधिकारी काय घेणार भूमिका शहराच्या हद्दवाढीनंतर येथील इंच इंच जमिनीला सोन्याचे दर येवू लागलेत. त्यामुळेच विकसक जमिनीचे प्लाटिंग पाडून चढय़ा भावाने विकू लागलेत. शाहूपुरीतील रांगोळे कॉलनीतही एका विकसकाने प्लॉटशेजारून वाहणारा ओढाच बुजवला आहे. यावर जिल्हाधिकारी शेखर सिंह काय निर्णय घेणार याची सातारकरांना प्रतिक्षा लागली आहे.