प्रतिनिधी / शाहुवाडी
कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्याबरोबरच तालुक्यात तीन रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने दहा गावे बफर झोनमध्ये आली आहेत. यामुळे प्रशासनाने सतर्कता घेतली असून येणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून चौकशी सुरू आहे. गेले पंधरा दिवस शाहुवाडी पोलिसांनी तालुक्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची कसून चौकशी करण्याबरोबरच कारवाईचा बडगा ही उगारला आहे.
शाहुवाडी तालुक्यातील उचत येथे एकापाठोपाठ तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सर्वत्र भितीचे वातावरण पसरले होते. प्रशासननाने उचतसह परिसरात बफर झोन केला आहे. यामुळे या परिसरात सर्वत्र सतर्कता घेतली आहे. बफर झोन परिसरात कोणतेही वाहन अथवा नागरिकांना प्रवेश बंदी असून केवळ अत्यावश्यक सेवांनाच प्रवेश दिला जात आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक अनिल कदम यांच्यासह शाहूवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून वेळोवेळी आढावा घेत आहेत.
प्रशासनाने सतर्कता घेऊनच सर्व यंत्रणा कार्यान्वित केली आहे. त्यामुळे बफर झोन परिसरासह शाहूवाडी तालुक्यात सर्वच ठिकाणी बाहेरून येणारे नागरिक, वाहने यांची कसून चौकशी केली जात असून काही परगावाहून आलेल्या नागरिकांना इन्स्टिट्यूशन केले जात आहे. एकूणच शाहूवाडी तालुक्यात कोरोना रोगाचा प्रसार रोखण्याच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवला असून मलकापूर शहरासह ग्रामीण भागातही पोलिसांची करडी नजर असून चौकशी व पूर्ण खबरदारी घेऊनच अत्यावश्यक वाहनांना प्रवेश दिला जात आहे.