प्रतिनिधी/ सातारा
शाहूपुरी चौकातील दोन दुकाने गुरूवारी चोरटय़ांनी फोडून 12 हजार रूपयांची रोकड लांबवली. या चोरीची माहिती मिळताच शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, गुरूवारी मध्यरात्री शाहूपुरी चौकातील जयभवन हौसिंग सोसायटीमध्ये श्री स्वामी समर्थ मेडिकल व श्री समर्थकृपा आईस्क्रीम ऍन्ड प्रुट अशा दोन दुकानाचे कुलुप तोडून चोरटय़ाने दुकानात प्रवेश केला. यावेळी मेडिकल दुकानात ठेवलेली 8 हजार 500 रूपये व आईस्क्रीम दुकानातून 4 हजार रूपये अशी रोख रक्कम आणि कॉस्मेटिक साहित्यांची चोरी केली. या चोरीची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली आहे. या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अज्ञात चोरटय़ाविरूद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात दुकानाचे मालक अभय चोरगे व खामकर यांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सूरू होती.