प्रतिनिधी\ सातारा
शाहूपुरी पोलीस ठाण्याला अपुरी इमारत असल्याने अनेक गैरसुविधांना सामोरे जावे लागत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी मोळाचा ओढा रस्त्यावर प्रशस्त इमारतीत पोलीस ठाणे स्थलांतरित करण्यात आले आहे. या नवीन कार्यालय इमारतीचा उद्घाटन सोहळा मकर संक्रतीच्या दिवशी कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
या उद्घाटन सोहळय़ास जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यावेळी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, संदीप शितोळे हे उपस्थित होते.
सातारा शहराची वाढती लोकसंख्या व त्यामुळे वाढलेली गुन्हेगारी यामुळे 2014 साली सातारा शहर पोलीस ठाण्याचे विभाजन करण्यात आले. त्यावेळी शाहूपुरी पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. आरंभी शाहूपुरी पोलीस ठाण्याला जी इमारत मिळाली ती अपुरी होती. त्यामुळे तिथे अनेक अडचणींना तोंड देत पोलीस दल काम करत होते. मात्र, तत्कालीन प्रभारी पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी नवीन इमारतीसाठी पाठपुरावा केला. त्याला वरिष्ठांनी पाठिंबा दिल्याने आज प्रशस्त इमारतीत शाहूपुरी पोलीस ठाणे कार्यरत झाले आहे. यापुढे या ठाण्याची कामगिरी आणखीन चांगली होईल, असा विश्वास यावेळी पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी प्रास्ताविकात व्यक्त केला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस हवालदार हसन तडवी, विश्वनाथ मेचकर, जयराम पवार, पोलीस नाईक लैलेश फडतरे, श्री देशमुख, धनंजय कुंभार, स्वप्नील कुंभार, अमित माने, ओंकार यादव, पांढरपट्टे तसेच कॉन्स्टेबल वैशाली गुरव, पोलीस नाईक वैशाली लोखंडे तसेच कर्मचाऱयांनी परिश्रम घेतले.