पोलिसांकडून चौकशी सुरू
वार्ताहर / राजापूर
शिकारीसाठी गेले असता गोळी लागून मृत्युमूखी पडलेल्या राजापूर तालुक्यातील नवेदर येथील अनिल धालवलकर यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी गुरूवारी काहीजणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गुढ अधिकच वाढले आहे.
तालुक्यातील नवेदर येथील अनिल धालवलकर लगतच्या धाऊलवल्ली पारवाडी येथील जंगलात शिकारीसाठी गेले असता बंदुकीची गोळी लागून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली होती. या प्रकरणी नाटे पोलिसांत दाखल झालेल्या फिर्यादीत धालवकर आणि त्यांचे एक सहकारी असे दोघेजणच शिकारीला गेले होते. तसेच धालवलकर यांना त्यांच्याजवळीलच बंदुकीतून सुटलेली गोळी लागल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र या घटनेबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. शिकारीसाठी दोघेच गेलेले नव्हते तर अन्य काहीजणही त्यांच्यासोबत शिकारीला गेले होते. तसेच शिकारीसाठी जंगलात फिरताना अन्य कोणीतरी डुकरावर झाडलेली गोळी धालवलकर यांना लागल्याची चर्चा या परिसरात दबक्या आवाजात सुरू आहे. शिवाय धालवलकर यांना गोळी लागून मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या अन्य सहकाऱयांनी सागरी महामार्गावर असलेल्या एका मोठय़ा हॉटेलवर एकत्र जमून चर्चा केली. त्यानंतर धालवलकर यांचा मृतदेह त्यांच्या घरी नेऊन ठेवल्याचे बोलले जात आहे.
पोलिसांनीही मृतदेह घरीच आढळून आला. जर धालवलकर यांना त्यांच्याजवळीलच बंदुकीची गोळी लागली होती तर मृतदेह जागेवरून का हलविण्यात आला, अशी चर्चा सध्या या परिसरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नाटे पोलिसांनीही या प्रकरणाची पाळेमुळे शोधण्यास सुरूवात केली आहे. गुरूवारी या प्रकरणाच्या चौकशीसाठी काहीजणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. या चौकशीत नेमकी काय माहिती समोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.