वार्ताहर/ शिरवळ
शिरवळ येथे महामार्गालगत असणाऱया फुलमळा या ठिकाणी लेक पॅलेस अपार्टमेंट येथे सजंय सुभाष पाटोळे (वय 31 रा. बिबवेवाडी पुणे) यांची गोळी झाडुन खून झाल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी सांयकाळी उशिरा घडला होता. या घटनेचा तपास 12 तासाच्या आत करण्यास शिरवळ पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेशन, सातारा यांना यश मिळाले असुन यामध्ये पुणे येथुन तीन तर फलटण येथुन दोन आरोपींना नाकाबंदी लाऊन ताब्यात घेतले आहे. कोंढवा पोलीस स्टेशन (पुणे) येथे मोक्का दाखल असलेला व सहा वर्षापासुन फरार असलेला मुख्य संशयित आरोपी तरबेज मेहमुद सुतार याच्यासह विकी राजेंद्र जाधव, शंकर अश्रुबा पारवे, नितीश सतीश पतंगे, राकेश सुरेश गायकवाड, किरण बबनराव साळुंखे (सर्व रा. पुणे) यांना ताब्यात घेण्यास सातारा पोलिसाला यश मिळाले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी शिरवळ पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे, उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. या घटनेबाबत पत्रकार परिषदेत पोलिसांनी सांगितले कि, येथील सहामजली असलेल्या लेक पॅलेसच्या टेरेसवर एक युवक रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याची खबर शिरवळ पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी अज्ञात इसमाने गोळी झाडून खून केले असल्याचे दिसुन आले. येथे गोळी झाडल्यानंतर एक पुगंळी ही पोलिसांनी सापडली. दरम्यान, या संशयितांनी व मयत यांनी जेवण करुन फ्लॅटमध्ये पार्टी ही केली होती. खून झाल्यानंतर येथे सापडलेल्या चित्रवस्तुच्या रुपाने मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात आली.
दरम्यान, गुह्याचे गांभीर्य पाहता वरिष्ठाच्या सुचनेनुसार, एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, शिरवळ पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, एपीआय राजकुमार भुजबळ, उपनिरीक्षक गणेश वाघ व सतिश आंदेलवार यांच्या अधिपत्याखाली तपास पथके रवाना करण्यात आली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पुणे येथे संशयितास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता मोक्यातील फरार आरोपी व पाच साथीदारांनी आर्थिक देवाणघेवाणीवरुन मृत व्यक्तीला गोळी मारुन खून केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पुणे येथुन तीन व फलटणवरुन दोन असे पाच संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. मटकाकिंग संशयित तरबेज सुतारसह विकी राजेंद्र जाधव, शंकर अश्रुबा पारवे, नितीश सतीश पतंगे, राकेश सुरेश गायकवाड, किरण बबनराव साळुंखे (सर्व रा. पुणे) या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे सहा ते सात मोबाईल फोन, बॅटरी व रोख रक्कम आढळून आली. मंगळवारी संशयितांना कोर्टात हजर करणार असल्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सांगितले. यानंतर सायंकाळी उशिरा कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे, उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, शिरवळचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, पोलीस निरीक्षक सायबर पोलीस ठाणे अरुण देवकर, पोलीस निरीक्षक रमेश गरजे सातारा, सहा. पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ शिरवळ, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ स्थानिक गुन्हे शाखा सातारा पो. उपनिरीक्षक सतीश आदेंलवार, पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, पोलीस अंमलदार शरद बेबले, मंगेश महाडिक, प्रवीण फरतडे, मुनीर मुल्ला, अमोल माने, अर्जुन शिरतोडे, स्वप्नील माने, निलेश काटकर, गणेश कापरे, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, स्वप्नील दौंड, सचिन ससाणे, शिवाजी गुरव, संभाजी साळुंखे, शिरवळ पोलीस अंमलदार अनिल बारेला, आप्पा कोलवडकर, जितेंद्र शिंदे, अरुण पाटणकर, नितीन महागंरे, प्रशांत वाघमारे, मंगेश मोझर, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार यशवंत घाडगे यांनी सदर कारवाई केली आहे.