कासेगाव पोलीसांची पहिलीच कारवाई : त्याची सांगली कारागृहात रवानगी
प्रतिनिधी/इस्लामपूर
शिराळा सुगंधानगर येथील गंभीर गुन्हयातील आरोपी रामचंद्र आनंदा वडार (३०) याच्यावर एमपीडीए (झोपडपट्टी दादा) अंतर्गत कासेगाव पोलीसांनी ही कारवाई केली. त्याला कासेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडयाच्या प्रयत्नात असताना अटक करण्यात आली होती. कासेगाव पोलीसांची एमपीडीएची ही पहिलीच कारवाई आहे.
कासेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश मते यांनी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. डॉ.चौधरी यांनी आरोपी वडार याला एक वर्ष स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्याची रवानगी सांगली कारागृहात करण्यात आली आहे. वडार याच्यावर एकूण गंभीर १६ गुन्हे दाखल आहेत. गेल्या मे महिन्यात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असताना त्याला कासेगाव पोलीसांनी अटक केली होती. ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख दिक्षित गेडाम, अप्पर जिल्हा पोलीस प्रमुख मनिषा दुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश मते, पोलीस नाईक महेश गायकवाड, सुनिल पाटोळे, अमर जाधव, राहूल पाटील, प्रशांत मोटे, दिपक घस्ते, रजणी जाधव, चंद्रकांत पाटील यांनी ही कारवाई केली.