चित्ररथ महामंडळाच्या बैठकीत सूर
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावमध्ये शिवजयंतीनिमित्त भव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाते. मिरवणूक पाहण्यासाठी बेळगावसह महाराष्ट्र व गोव्यातून शिवभक्त बेळगावमध्ये दाखल होतात. शिवकाळ जागृत करण्याचे काम चित्ररथ मिरवणुकीतून होते. परंतु मागील काही दिवसांपासून डीजे व ढोल-ताशाच्या अतिरेकामुळे मिरवणुकीतील सजिव देखाव्यांचा पारंपरिकपणा कमी होत आहे. यामुळे डीजे व ढोलताशा लावणाऱया चित्ररथांसाठी स्वतंत्र मार्ग करावा, असा सूर मंगळवारी आयोजित चित्ररथ महामंडळाच्या बैठकीत उमटला.
धर्मवीर संभाजी चौक येथील जत्तीमठ येथे चित्ररथ महामंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत चित्ररथ मिरवणुकीत सहभागी होणाऱया मंडळांनी विविध विषयांवर चर्चा केली. मिरवणूक वेळेत सुरू करून संपविणे गरजेचे असते. त्यामुळे कोणतेही वाद-विवाद न करता शिस्तबद्धरित्या एक आदर्श चित्ररथ मिरवणूक काढण्याचा प्रयत्न सर्वच मंडळांनी करावा, असे मंडळांनी आवाहन केले आहे.
मिरवणूक मार्गावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अग्निशमन वाहन, रुग्णवाहिका उपलब्ध करण्याची मागणी केली. चित्ररथांना परवाने मिळविण्यासाठी महामंडळ सहकार्य करेल, असे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी अध्यक्ष सुनील जाधव, येतेश हेब्बाळकर, जे. बी. शहापूरकर, प्रसाद मोरे, मेघन लंगरकांडे, गुणवंत पाटील, निशा कुडे, विनायक हलगेकर, श्रीधर देसाई, हेमंत शिंदे, विजय पवार, आकाश धुराजी, राहुल जाधव यांसह मोठय़ा संख्येने शिवभक्त उपस्थित होते.