पोलीस, कार्यकर्त्यांत वादावादी, 40 हून अधिक जणांवर गुन्हा दाखल, चौघांना घेतले ताब्यात
प्रतिनिधी / बेळगाव
सहय़ाद्रीनगर परिसरात रविवारी रात्री शिवपुतळा प्रति÷ापनेचा प्रयत्न झाला. या मुद्दय़ावरुन पोलीस व कार्यकर्त्यांत वादावादीचा प्रसंग घडला असून पोलिसांनी चौघा जणांना ताब्यात घेतले आहे तर 40 हून अधिक जणांवर येथील एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
महानगरपालिकेच्या जागेत परवानगीशिवाय पुतळा बसविण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत महापालिकेच्या अधिकाऱयांनी फिर्याद दिली आहे तर कोविड नियमांचे उल्लंघन करीत सरकारी जागेत अतिक्रमण व प्रवेश, पोलिसांना धक्काबुक्की केल्या प्रकरणी पोलीस अधिकाऱयांनीही स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे.
पुतळा बसविण्यास आक्षेप
सह्याद्रीनगर येथे भव्य शिवपुतळा बसविण्याचा प्रयत्न झाला. रविवारी रात्री या संबंधिची माहिती मिळताच पोलीस अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले. महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय महापालिकेच्या जागेवर पुतळा बसविण्यास आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे पोलीस व कार्यकर्ते यांच्यात वादावादीचा प्रसंग घडला.
मार्केटचे प्रभारी एसीपी एन. व्ही. बरमनी, एपीएमसीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ व शहरातील इतर अधिकारीही सह्याद्रीनगर परिसरात दाखल झाले. या परिसरात जादा कुमक मागविण्यात आली. पोलिसांनी शिवपुतळा ताब्यात घेतला असून तो नेमका कोठे ठेवण्यात आला आहे, याची माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांत संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मूर्तीकार संजय किल्लेकर यांच्यावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सहय़ाद्रीनगर येथील चार कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. या कार्यकर्त्यांची सुटका करण्यासाठी रात्री उशीरापर्यंत हिंदू संघटनांचे नेते, कार्यकर्ते एपीएमसी पोलिस स्थानकासमोर ठाण मांडून होते.