प्रतिनिधी /म्हापसा
छत्रपती शिवाजी महाराजांचे घरोघरी निरंतर स्मरण होण्यासाठी सरकारने शिवचरित्रावर आधारित उपक्रम राबवावेत जेणेकरून शिवाजी महाराजांचे चरित्र व त्यांचा तेजस्वी पराक्रम मुलांच्या मनामनात जिवंत राहील असे मत शिवसेना गोवा राज्यप्रमुख जितेश कामत यांनी व्यक्त केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
म्हापशातील शिवप्रेमी तथा ज्येष्ठ शिवसैनिक श्रीकांत सिमेपुरुषकर यांच्या पुढाकाराने शिवसेनेतर्फे म्हापसा येथील टॅक्सीस्थानकावर आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक सुधीर कांदोळकर, गोवा मंदिर महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत (भाई) पंडित, बोडगेश्वर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय बर्डे, शिवसेना उपराज्यप्रमुख सुभाष केरकर, आनंद आमोणकर, मंदार पार्सेकर व सामाजिक कार्यकर्ते दीपेश नाईक, गोवा राज्य प्रमुख जितेश कामत, जयेश थळी व तुषार टोपले उपस्थित होते.
जितेश कामत म्हणाले की, ‘पावनखिंड’ हा बाजीप्रभू देशपांडेंच्या पराक्रमावरील चित्रपट प्रत्येकाने पाहावा व सरकारने तो टॅक्स फ्री करावा. तसेच काश्मिर फाईल्स हाही चित्रपट लोकांनी आवर्जून पाहावा. हिंदूवर होणारा अन्याय त्यामुळे सर्वांच्याच लक्षात येईल. सुभाष केरकर म्हणाले की, आई असावी तर ती जिजाऊसारखी जिने महान राष्ट्रपुरुष घडविला. शिवाजी महाराजांनी जात-पात, धर्म न पाहता रयतेच्या हिताचे राज्य निर्माण केले. परंतु काही लोकांनी विकृत इतिहास मांडण्याचा प्रयत्न चालविला आहे, ही निषेधार्ह बाब आहे. आजच्या राज्यकर्त्यांनी महाराजांचा आदर्श डोळय़ासमोर ठेवून प्रशासन चालवावे असे आवाहन केले.
प्रारंभी छत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. पांडुरंग शिरोडकर यांनी बासरीच्या सुरांवर ‘जयोस्तुते..’ गीत सादर केले. सूत्रसंचालन संगम भौंसुले यांनी तर आभार अस्मित भोसले यांनी केले. या कार्यक्रमात शिवोली येथील डॉ. सचिन गोवेकर, म्हापसा येथील सारस्वत विद्यालय संस्थेच्या काकुलो महाविद्यालयातील अध्यापक जनार्दन ताम्हणकर, पद्मनाभ संप्रदायाचे किटला, साल्वादोर-द-मुंद येथील प्रचारक सुभाष साळगावकर, खासगी बसमालक संघटनेचे अध्यक्ष सुदीप ताम्हणकर, मोपा विमानतळ संघर्ष समितीचे कार्यकर्ता नारायण गडेकर, बांबोळी येथील सामाजिक कार्यकर्ता रामा काणकोणकर व सुकूर-पर्वरी येथील नाटय़कलाकार रामा साळगावकर यांचा सत्कार करण्यात आला.