रत्नागिरीत शिवसैनिक रस्त्यावर
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोकणात आता शिवसेनाविरुध्द राणे पिता-पुत्र अशा राजकीय वर्चस्वासाठी उसळलेला वणवा आता अधिकच भडकू लागला आहे. सेनेचे खासदार विनायक राऊतविरुध्द माजी खासदार नीलेश राणे अशा दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्याने येथील राजकीय वातावरण तापले आहे. त्यात आपल्या नेत्यांवर होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी कार्यकर्त्यांनीही उडी घेतली आहे. शनिवारी संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी माजी खासदार नीलेश राणे यांच्या निषेधासाठी रस्त्यावर उतरून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळय़ाला ‘चप्पल मारो’ आंदोलन केले.
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्याकडून राणे पिता-पुत्रांवर झालेल्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून भाजपाचे प्रदेश सचिव तथा माजी खासदार नीलेश राणे यांनीही राऊत यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. त्यावेळी नीलेश राणे यांनी राऊत यांच्यावर जहरी टीका करताना त्यांनी भाषा बदलली नाही तर जिथे दिसशील तिथे फटके मारेन, अशा शब्दात ठणकावले. नीलेश राणेंच्या या टीकेवरून सिंधुदुर्गसह रत्नागिरीतील शिवसैनिकांत कमालीचा असंतोष निर्माण झाला. नीलेश राणेंच्या या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी रत्नागिरीत शिवसेनेतर्फे झालेल्या पत्रकार परिषदेत जर हिंमत असेल तर त्यांनी रस्त्यावर येऊन आमच्याशी दोन हात करावेत. आम्ही तयार आहोत, असा सज्जड इशारा शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे यांनी पत्रकार परिषदेत देण्यात आला. शिवसैनिकांकडे संयम आहे तोपर्यंत ते शांत राहतील. एकदा संयम सुटला की शिवसैनिक त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी त्यांच्यापेक्षा डबल फटके आम्ही देऊ, असेही ठणकावले. त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्येही प्रदेश सचिव नीलेश राणे यांच्यावर झालेल्या टीकेवरून संतापाची लाट उसळली आहे. भाजपाही शिवसैनिकांना ठणकावत आम्हीही जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी आता शिवसेनाविरुध्द भाजपा असा राजकीय संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. शनिवारी भाजपा प्रदेश सचिव नीलेश राणेंविरोधात रत्नागिरीत तमाम शिवसैनिक पुन्हा रस्त्यावर उतरले. अगदी संगमेश्वर, लांजा, राजापूर, रत्नागिरी येथून मोठय़ा संख्येने शिवसैनिक यादिवशी निषेध आंदोलनासाठी दाखल झाले होते.
मारूती मंदिर येथील खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात एकत्र जमून सर्व शिवसैनिक मारुती मंदिर सर्कलजवळ रॅलीने या आंदोलनासाठी गेले. त्या ठिकाणी खासदार राऊत यांच्यावर खालच्या थराला जाऊन टीका करणाऱया नीलेश राणे यांचा उपस्थित शिवसैनिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला. यापुढे राणे यांच्याकडून टीका झाल्यास त्यांची ही वायफळ बडबड न थांबल्यास येथील शिवसैनिक गप्प बसणार नसल्याचा इशारा उपस्थित सेनेच्या पदाधिकाऱयांनी दिला आहे. यावेळी नीलेश राणेंच्या प्रतिकात्मक पुतळय़ाला महिला शिवसैनिकांनी ‘चप्पलांचे फटके मारून निषेध व्यक्त केला. हे आंदोलन जिल्हाप्रमुख विलास चाळके, जिल्हा संपर्क नेते राजेंद्र महाडिक, जि.प.अध्यक्ष रोहन बने, ज्येष्ठ पदाधिकारी प्रमोद शेरे, तालुकाप्रमुख बंडय़ा साळवी, दळवी, जगदीश राजापकर, सरवणकर, जया माने, वेदा फडके, नेहा माने, मनीषा बामणे आदी प्रमुख पदाधिकाऱयांनी केले होते. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही शिवसेनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. नीलेश राणे यांचे कार्यकर्ते विनायक राऊत यांच्याबद्दल अपमानास्पद मजकूर सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरवत आहेत. तरी या कारणाने जिह्याच्या शांततेचा भंग झाल्यास जिह्याची कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते. असे झाल्यास याला सर्वस्वी नीलेश राणे व त्यांचे कार्यकर्ते जबाबदार असणार आहेत. या घटनेची आपण गांभीर्याने दखल घेऊन संबंधित व्यक्तीवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे.