अधिकाऱ्यांबरोबर संवाद आणि विद्यापीठाच्या अहवालाचे सादरीकरण. सायंकाळी सांसकृतिक कार्यक्रम
प्रतिनिधी / कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठाच्या चौथ्या `नॅक’ पुनर्मूल्यांकनास आज सकाळपासून प्रारंभ झाला. दिवसभरात समितीने कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह विविध घटकांशी संवाद साधला. सुमारे 16 अधिविभागांना प्रत्यक्ष भेट देऊन समितीने पाहणी केली.
शिवाजी विद्यापीठाच्या नॅक पुनर्मूल्यांकनाच्या चौथ्या फेरीसाठी प्रा. जे. पी. शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय समितीचे आज सकाळी विद्यापीठाच्या प्रांगणात आगमन झाले. समितीमध्ये प्रा. बी. आर. कौशल, प्रा. एस. ए. एच. मोईनुद्दिन, प्रा. तरुण अरोरा, प्रा. सुनील कुमार, प्रा. हरिश चंद्रा दास यांचा समावेश आहे. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील आणि कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्यासह विद्यापीठ अधिकाऱयांनी समिती सदस्यांचे विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यासमोर स्वागत केले. शिवपुतळ्यास पुष्प वाहून अभिवादन केल्यानंतर समिती सदस्यांनी ठीक नऊ वाजता विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये प्रवेश केला. समितीने थेट पुनर्मूल्यांकनाच्या कामकाजास सुरवात केली.
विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या विद्यापीठाच्या वाटचालीविषयी सविस्तर सादरीकरणाने मूल्यांकनास सुरवात झाली. त्यानंतर समितीने विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, अभ्यास मंडळांचे अध्यक्ष, विविध विभाग प्रमुख, शिक्षक व संशोधक यांच्यासमवेत चर्चा केली. त्यानंतर दुपारच्या सत्रात परीक्षा व मूल्यमापन मंडळ, आयसीटी कक्ष यांच्यासह निवडक विभाग प्रमुखांशी चर्चा केली. सीएफसी, लीड बॉटेनिकल गार्डन यांचीही समितीने पाहणी केली. सायंकाळच्या सत्रात विद्यार्थी विकास विभाग आणि संगीत व नाटÎशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने समितीसमोर विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.