ऑनलाईन शुल्क भरण्यास अडचण येणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑफलाईनची सुविधा
कोल्हापूर प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठातील दहा वसतगृहाचे प्रवेश सुरू झाले आहेत. दहा वसतिगृहात जवळपास 800 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर 350 विद्यार्थी वसतिगृहात राहण्यासाठी आले आहेत. काही दिवस वसतिगृहाचे ऑनलाईन शुल्क भरण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे ज्यांना ऑनलाईन शुल्क भरण्यास अडचण येत आहे, त्यांनी ऑफलाईन शुल्क भरावे, असे आवाहन वसतिगृह अधीक्षक डॉ. एस. पी. हंगिरगेकर यांनी केले आहे.
गेल्या दोन वर्षापासून वसतिगृह बंद असल्याने विद्यापीठ कँपसवर शुकशुकाट असायचा. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सर्व महाविद्यालये, वसतिगृह शंभर टक्के क्षमतेने सुरू केली आहेत. वसतिगृहाच्या अधिक्षकांनी विद्यापीठातील 38 अधिविभागांना विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे पत्र पाठवले होते. त्यानुसार आठ दिवसात जवळपास 800 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे अधिविभागात विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढणार आहे. तसेच बाहेरगावच्या विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची सोय झाल्याने त्यांच्यातही आनंदाचे वातावरण आहे.