सदलगा येथील शेतकऱयांचे निवेदन
बेळगाव : सदलगा येथील सर्व्हे क्रमांक 374 व इतर सर्व्हे क्रमांकाच्या शिवाराकडे जाण्यासाठी आम्हाला रस्ता उपलब्ध करुन द्यावा या मागणीसाठी सदलगा येथील शेतकऱयांनी जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले. जवळपास 45 एकर जमीन असून त्या जमिनीमध्ये ऊसपीक आहे. मात्र तो ऊस तोडण्यासाठी रस्ता नसल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. तेव्हा तातडीने आम्हाला रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेताला जाण्यासाठी रस्ता उपलब्ध होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून आम्हाला रस्त्यावरुन ये-जा करण्यास मज्जाव करण्यात येत आहे याचबरोबर धमकीही दिली जात आहे. तेव्हा पूर्वीप्रमाणेच आम्हाला रस्ता उपलब्ध करुन द्यावा, असे या निवेदनात म्हटले आहे. 15 कुटुंबे ही जमीन कसत आहेत. आता ऊस तोडणे गरजेचे आहे. त्यामुळे समस्या निर्माण झाली असून तातडीने रस्ता करुन द्यावा, असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी अजित माळुमल्लागोळ, सुमन मलिकवाड, कुमार मलिकवाड, अप्पासाब भोजे, शांतीनाथ भोजे, श्रीकांत भोजे, प्रकाश भोजे, संतोष भोजे, सुरेश भोजे, राजेंद्र माळुमल्लागोळ यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.