प्रतिनिधी/ पणजी
किनाऱयावरील शॅकसंबंधीच्या विविध शुल्कात 40 ते 50 टक्के कपात केली असून सरकारच्या या निर्णयामुळे शॅक व्यावसायिकांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. यावर्षी पर्यटन शॅकसंबंधी विविध शुल्कात कपात करण्यात येणार असल्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी घोषणा केली होती. त्याची आता अंमलबजावणी करण्यात आली आहे.
कोविड महामारीचा संसर्ग कमी होत असल्याने पुन्हा पर्यटन क्षेत्रात उभारी मिळत असल्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र त्यासाठी पर्यटन व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे पर्यटन व्यावसायिकांचे म्हणणे होते. पर्यटन शॅकसंबंधीच्या शुल्कात कपात करण्यात यावी, अशी शॅक मालक संघटनेने मागणीही केली होती. पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांची भेट शॅकमालक संघटनेने घेतली होती. त्यावेळी मंत्री खंवटे यांनी शॅक मालक संघटनेची मागणी विचाराधीन असल्याचे सांगितले होते. शॅक शुल्कात कपात करण्यात येणार असल्याचे आश्वासनही दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करण्याचा आदेश पर्यटन विकास महामंडळाने जारी केला आहे.
पर्यटन खात्याकडून या हंगामातील पर्यटन शॅकसंबंधी नवीन शुल्क जाहीर करण्यात आले आहे. एक पर्यटन शॅकसाठी 20 डेकबेड आणि तितक्याच छत्र्या यासाठी 25 हजार रुपये भरावे लागत होते. त्यात आता सुमारे 40 टक्के कपात करून 15 हजार रुपये भरावे लागणार आहेत. कचरा विल्हेवाटीसाठीचे शुल्क म्हणून प्रत्येक शॅकमालकाला 10 हजार रुपये भरावे लागत होते. त्यात आता 50 टक्के कपात करून 5 हजार रुपये भरावे लागतील.
शॅक व्यवसायसंबंधीच्या इतर सोयीच्या शुल्कात कपात करण्यात आली असली तरी शॅक शुल्कात बदल करण्यात आलेले नाही. शॅक व इतर सर्व प्रकारे शुल्क हे 2019-22 च्या शॅक धोरणानुसार राहणार आहेत. शुल्क भरण्यासाठीच्या कालावधीत मुदतवाढ देण्यात आली असून आता 4 नोव्हेंबर 2022 पर्यंत व्यावसायिक शुल्क जमा करू शकतात. राज्यातील 33 किनाऱयांवर एकूण 331 शॅकना परवानगी देण्यात आली आहे.