जागतिक संकेताचा परिणाम : सेन्सेक्समध्ये 144 अंकांची वाढ
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक सकारात्मक संकेताच्या जोरावर सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी बीएसई सेन्सेक्स 144 अंकांच्या वाढीसह बंद झाला तर निफ्टी 26 अंकांच्या वाढीसह बंद झाला. मागच्या आठवडय़ात सलग तीन सत्रातील घसरणीला अखेर सोमवारी बेक लागला.
सोमवारी दिवसभरात समभागांमध्ये चढ-उतार दिसून आली आणि सरतेशेवटी सेन्सेक्सचा निर्देशांक 144 अंकांच्या वाढीसह 39,757.58 वर तर निफ्टीचा निर्देशांक 26.75 अंकांच्या वाढीसह 11,669.15 बंद झाला. दिवसभराच्या व्यवहारात 633 अंकांची चढ-उतार दिसून आली. सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँकेचे समभाग सर्वात नफ्यात राहिले होते. जवळपास 7 टक्के इतके समभाग वाढले होते. यापाठोपाठ आयसीआयसीआय बँक, ऍक्सिस बँक, एचडीएफसी, भारती एअरटेल, स्टेट बँक ऑफ इंडिया, बजाज फायनान्स आणि एचडीएफसी बँक यांच्या समभागांनीही चांगली तेजी दर्शवली होती. यांच्या जोरावर बँक निफ्टीने सोमवारी दमदार कामगिरी केली. ज्याचा फायदा सेन्सेक्स आणि निफ्टी यांनीही उठवला.
दुसरीकडे सर्वाधिक नुकसानीत राहिली ती रिलायन्स इंडस्ट्रिज. यांचे समभाग 9 टक्क्यापर्यंत घसरल्याचे दिसून आले. भांडवली बाजारातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रिजने सोमवारी धक्का दिला. दुसऱया तिमाहीत कंपनीच्या नफ्यात आलेली घट पडझडीला कारणीभूत ठरली आहे. सप्टेंबरमध्ये कंपनीचा नफा 15 टक्के घटला होता. यासोबत एचसीएल टेक, टीसीएस, टाटा स्टील, एशियन पेंटस्, बजाज ऑटो, मारूती आणि अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्याही नुकसानीत राहिल्या.
जाणकारांच्या मते बँकांचे दुसऱया तिमाहीचे निकाल नफ्यात लागल्याने याचा परिणाम सोमवारी बँक निफ्टीच्या निर्देशांकावर दिसून आला. त्याचप्रमाणे जीएसटी संकलनही वाढून ऑक्टोबरमध्ये 1 लाख कोटींवर पोहचल्याचा सकारात्मक परिणाम बँक निफ्टीवर दिसून आला.
वाहनांच्या विक्रीतील वाढीचाही चांगला परिणाम शेअर बाजारावर जाणवला.
जागतिक स्तरावर शांघाई, हाँगकाँग, सोल आणि टोकीयो बाजारांमध्ये तेजी पाहायला मिळाली. युरोपच्या बाजारात सुरूवातीला तेजी दिसून आली होती. बेंट प्रुड तेलाचा आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव 2.06 टक्के घटून 37.16 डॉलर प्रति बॅरलवर राहिला. तर दुसरीकडे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 32 पैसे घटून 74.42 वर बंद झाला.