गुंतवणूकदारांना 5.45 लाख कोटींचा फटका : गेल्या 11 वर्षातील सर्वाधिक साप्ताहिक घसरण
मुंबई / वृत्तसंस्था
चीनमधील वुहानपासून सुरू झालेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता जगभरात पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या व्यापकतेचे आर्थिक परिणाम जगभरात प्रत्यक्षपणे दिसू लागले आहेत. या परिस्थितीचा परिणाम भारताच्या शेअर बाजारावरही दिसून आला. शुक्रवारी, आठवडय़ाच्या अखेरच्या दिवशी वर्षाची सर्वात मोठी घसरण झाली असून सेन्सेक्सने सुमारे 1,448 अंकांनी आपटी घेतल्याने तो 38,297.29 च्या पातळीवर बंद झाला. निफ्टी निर्देशांकही 11,201.75 पर्यंत खाली आला असून 432 अंकांची घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांचे तब्बल 5.45 लाख कोटींहून अधिक रकमेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक दावा करण्यात येत आहे. मात्र, हा फटका 6 लाख कोटींपेक्षा जास्त असू शकतो, असे मत तज्ञांनी नोंदवले आहे.
मागील आठवडय़ापासून शेअर बाजारात सुरू असलेली घसरण शुक्रवारीही कायम राहिली. नोव्हेंबर 2016 नंतर प्रथमच सेन्सेक्समध्ये सर्वात मोठय़ा घसरणीची नोंद झाली. शेअर बाजारामध्ये गेल्या 11 वर्षातील ही सर्वात मोठी साप्ताहिक घसरण झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. गेल्या आठवडाभरात विविध कंपन्यांचे समभाग घसरल्याने मालकांना तब्बल 11 लाख कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचेही सांगितले जात आहे.
साडेपाच लाख कोटींचे नुकसान
केवळ शुक्रवारी एका दिवसात गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. गुरुवारी 1,52,40,024.08 कोटींवर असलेली बीएसई निर्देशांकाची बाजारपेठ शुक्रवारी 1,46,94,571.56 कोटीपर्यंत घसरली होती. या दृष्टीने बाजारपेठेत केवळ एका दिवसात जवळपास साडेपाच लाख कोटींची (5,45,452.52 कोटी) घट दिसून आली.
कोरोना हेच घसरणीचे कारण…
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विदेशी गुंतवणूकदारांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. या विषाणूचा केंद्रबिंदू असलेल्या चीनमध्ये मंदीसारखे वातावरण आहे. भारतीय बाजारपेठ मुख्यत्वेकरून चीनकडून होणाऱया आयातीवर अवलंबून असते. अशा परिस्थितीत चीनच्या मंदीचा परिणाम भारतीय बाजारावर होत असल्याने गुंतवणूकदार धास्तावले असल्याने त्याचा थेट परिणाम शेअर बाजारावर झाल्याचे बाजार तज्ञांचे मत आहे.
अमेरिकेसह अन्य देशांमध्येही मोठी घसरण
जागतिक पातळीवरही सध्या शेअर बाजाराची स्थिती वाईट आहे. गुरुवारी अमेरिकेचा डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेज निर्देशांक 1,190.95 अंकांनी घसरला होता. ही अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी एकदिवसीय घसरण आहे. आशियाई बाजारात चीनचा शांघाय कंपोझिट, हाँगकाँगचा हँगसेंग, दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि जपानचा निक्की आदी बाजारांचे निर्देशांकही चार ते साडेचार टक्क्यांनी घसरले आहेत. आशियातील प्रत्येक मोठय़ा स्टॉक मार्केटमध्ये अशीच परिस्थिती दिसून येत आहे.
ट्रम्प यांनी फोडले विरोधकांवर खापर
अमेरिकन शेअर बाजाराच्या बिघडलेल्या परिस्थितीसाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विरोधक असलेल्या डेमोक्रेटिक पक्षाला जबाबदार धरले आहे. डेमोक्रेटिक नेत्यांच्या कारस्थानांमुळेच देशाची आर्थिक बाजारपेठ अडचणीत आल्याचे वक्तव्य ट्रम्प यांनी केले आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसंबंधीच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात डेमोक्रेटिक पक्ष आघाडीवर असल्याने ट्रम्प यांनी त्यांच्यावर आरोप करायला सुरुवात केली आहे.