नव्या आफ्रिकन कोरोना व्हेरिएंटचा परिणाम
मुंबई / वृत्तसंस्था
आठवडय़ातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी भारतीय शेअर बाजार मोठय़ा घसरणीसह बंद झाले. शुक्रवारी दिवसअखेर बीएसई निर्देशांक 1,687.94 अंकांनी किंवा 2.87 टक्क्यांनी घसरून 57,107.15 वर बंद झाला. तर निफ्टी निर्देशांक 509.80 अंकांनी किंवा 2.91 टक्क्यांनी घसरून 17,026.45 वर बंद झाला. शुक्रवारी सकाळी बीएसई 540.3 अंकांच्या घसरणीसह 58,254.79 वर उघडला. दुसरीकडे, निफ्टी 197.5 अंकांनी घसरून 17,338.75 वर उघडला होता. दिवसभराच्या व्यवहारात तो 550.55 अंकांनी खाली आला होता.
दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचे नवीन प्रकार आढळले आहेत. हा प्रकार समोर आल्यानंतर, भारत सरकारच्या आरोग्य सचिवांनी निर्देश जारी करत भारतात येणाऱया सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कोरोनाची सखोल चाचणी करावी, असे निर्देश दिल्याचे परिणाम शेअर बाजारात दिसून आले. दिवसभरातील व्यवहारात बीएसईमधील सुमारे 47 टक्के कंपन्यांचे समभाग घसरले. याची मार्केट कॅप 258 लाख कोटी रुपये होते. दिवसभरात 3,415 कंपन्यांच्या समभागांचे व्यवहार झाले असून 1,069 कंपन्यांचे समभाग वाढले तर 2,242 कंपन्यांचे समभाग घसरले. 237 कंपन्यांचे समभाग एक वर्षाच्या उच्चांकावर तर 34 कंपन्यांचे समभाग एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर राहिले.
गुंतवणूकदारांनी गमावले 6.4 लाख कोटी
शेअरबाजाराची प्रचंड पडझड शुक्रवारी झाल्याने गुंतवणूकदारांनी किमान 6 लाख 40 हजार कोटी रुपये गमावले असल्याचे दिसून आले आहे. ही एका दिवसातील काही मोठय़ा पडझडींपैकी एक आहे. आता गुंतवणूकदारांचे लक्ष सोमवारकडे आहे. शनिवार आणि रविवार बाजाराला सुटी आहे. मात्र, सोमवारी पुन्हा खरेदी वाढून शेअरबाजार शुक्रवारी झालेली हानी काही प्रमाणात तरी भरुन काढण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली. तरीही सावधानतेचा इशाराही देण्यात आला.