अदानी पॉवरच्या समभागात 20 टक्क्यांची उसळी, बँकिंग समभागही तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी शेअर बाजार मजबुतीसह बंद होण्यास यशस्वी झाला आहे. बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 228 अंकांच्या तेजीसह 52,328.91 वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 81 अंकांच्या वाढीसह 15,751.65 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्स आपल्या सर्वोच्च अंकांचा स्तर(52,516) गाठण्यासाठी फक्त 188 अंकांच्या वाढीची गरज आहे. शेअरबाजाराने सोमवारी दमदार सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले. बीएसई सेन्सेक्सचा निर्देशांक सोमवारी 131 अंकांच्या तेजीसह 52,231.38 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 15,725 अंकावर खुला झाला. आयसीआयसीआय बँक, आयटीसी व एसबीआयच्या समभागातील तेजी व विदेशी गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीचा वाढता प्रवाह याचा शेअरबाजाराला मजबूत आधार मिळाला. सेन्सेक्समध्ये पॉवरग्रिड कॉर्पचा समभाग सर्वाधिक 1 टक्के इतका तेजीत होता. एल अँड टी, एनटीपीसी, ओएनजीसी, आयटीसी, एसबीआय, बजाज ऑटो व आयसीआयसीआय बँक यांचे समभाग तेजीत होते. बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी, एशियन पेंट्स व डॉ. रेड्डीज लॅब्ज मात्र नुकसानीत होते.
कोरोना महामारीसंबंधीचे ताजे चित्र, लसीकरणाचा वेग तसेच जगभरातील घडामोडींवर शेअरबाजाराची पुढची वाटचाल ठरणार आहे. बाजारातील गुंतवणूकदारांचे सध्या मान्सूनवर लक्ष असणार आहे. यंदाही मान्सून चांगला असल्याचे भाकित वर्तवले असून मान्सूनने भारतात आगमनही केले आहे. स्थानिक बाजारात सोमवारी खरेदीवरच भर होता. बाजारात ऊर्जा, ऑटो व रियल्टी क्षेत्रातील समभागांची खरेदी होत होती. माझगाव डॉक, एंजल ब्रोकिंग, रेडिको खैतान, रेलिंग्टन, केएसबी लिमिटेडचे समभाग 52 आठवडय़ाच्या उच्चांकावर पोहोचले. या कंपन्यांचे समभाग 6 ते 13 टक्के तेजीत होते.
जागतिक बाजारात जपानचा निक्केई व कोरियाचा कोस्पी निर्देशांक तेजीत तर चीनचा शांघाई कंपोझिट व हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक दबावात होता. शुक्रवारी सेन्सेक्स निर्देशांक 132 अंकांच्या घसरणीसह 52,100.05 वर तर निफ्टी निर्देशांक 20 अंकांच्या घसरणीसह 15,670.25 अंकांवर बंद झाला होता.