मुंबई :
सलग दुसऱया दिवशी या आठवडय़ात शेअर बाजारात घसरण दिसून आली आहे. दिवसभर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि निफ्टी या दोन्ही बाजारात घसरण आणि वाढ यांचा खेळ सुरु होता. सरतेशेवटी मात्र 30 शेअर्स असणारा सेन्सेक्स 26.88 अंकांनी घसरुन 34 हजार 842.10 वर आणि निफ्टी 16.40 अंकांनी घसरुन 10 हजार 288.90 वर बंद झाला.
बुधवारीही शेअर बाजार सरतेशेवटी घसरणीतच बंद झाला होता. त्यामुळे गुरूवारी बाजारात काय होणार याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले होते. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 5 पैसे मजबूत होऊन 75.67 वर बंद झाला. सोन्या चांदीच्या दरातही शेअर बाजारात घसरण दिसून आली.
आजच्या दिवशी सेन्सेक्समधील कंपन्या जशा की आयटीसी, बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा बँक, हिंदूस्थान युनिलीव्हर, सनफार्मा, स्टेट बँक, नेस्ले इंडिया, एचडीएफसी बँक आणि मारुती यांचे समभाग फायद्यात होते तर दुसरीकडे बजाज ऑटो, एनटीपीसी, रिलायन्स, महिंद्रा आणि महिंद्रा, एअरटेल, एचसीएल टेक, इन्फोसिस, पॉवर ग्रीड अशा कंपन्यांचे समभाग नुकसानीत राहिले. निफ्टी बँक 0.37 टक्के, एफएमसीजी 2.12 टक्के, खासगी बँकांमध्ये 0.37 टक्क्यांची तेजी दिसून आली.
आज सकाळी 11.30 ते 2 वाजेपर्यंत शेअर बाजारात समभागाच्या किमतीत वाढ आणि घसरण मोठय़ा प्रमाणात दिसून आली. 35 हजारच्या खाली सुरु झालेला सेन्सेक्स दुपारी 12.52 मिनीटानी 34 हजार 574 पर्यंत झेप घेऊ शकला. या दरम्यान निफ्टीतल्या कंपन्यांचे समभागही वाढ आणि घसरण नोंदवत होते. पुन्हा दुपारी 2 वाजायच्या सुमारास सेन्सेक्स 35 हजारच्या दिशेने खाली घसरल्याचे पहायला मिळाले. यावेळी गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा निराशेचा सूर उमटला.
आजच्या सत्रामध्ये एशियन पेंट्सला सर्वाधिक 3 टक्क्यांचे नुकसान झाले असून याच्या पाठोपाठ हिंडाल्को, इंडियन ऑईल, आयशर मोटर्स, इन्फोसिस, श्री सिमेंट, अदानी पोर्टस्, भारत पेट्रोलियम यांचेही समभाग घसरल्याचे पहायला मिळाले. या दरम्यान आयटीसीचे समभाग 6 टक्क्यांपर्यंत वाढल्याचे दिसून आले. या सोबत हिरो मोटो कॉर्प, बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा बँक, गेल इंडिया, वेदान्ता, सिप्ला, आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या समभागांनी वाढ नोंदवली.
दरम्यान कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच देशांच्या व्यवहारांवर व्यापक परिणाम झाला आहे. याच कारणास्तव प्रति बॅरल कच्या तेलाची किंमत 67 डॉलर वरून 18 डॉलर वर घसरली. त्यामुळे इंडियन ऑईलला 14 हजार कोटीहून अधिक नुकसान झाल्याची माहिती सांगण्यात आली.