सेन्सेक्समध्ये 32 अंकांची वाढ, पॉवरग्रिड सर्वाधिक लाभात
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक बाजारांतील सकारात्मक संकेतामुळे भारतीय शेअर बाजार आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी किंचित अंकांच्या वाढीसह बंद होण्यास यशस्वी झाला. सेन्सेक्समधील पॉवरग्रिडचा समभाग सर्वाधिक नफ्यात राहिला होता.
सोमवारी सरतेशेवटी सेन्सेक्स निर्देशांक 32.02 अंकांच्या म्हणजेच 0.05 टक्के वाढीसह 60,718.71 वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 6.70 अंकांच्या म्हणजेच 0.04 टक्के वाढीसह 18,109.45 अंकांवर बंद झाला.
सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजाराने तेजीसह प्रारंभ केला. जागतिक सकारात्मक वातावरणाचा लाभ घेत सेन्सेक्स निर्देशांक सकाळच्या सत्रात 300 अंकांच्या वधारासह कार्यरत होता. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक व कोटक बँक यांचे समभाग तेजी राखून होते. एकावेळी सेन्सेक्स 315 अंकाच्या तेजीसह निर्देशांक 61,002 अंकांवर कार्यरत होता. तर निफ्टी निर्देशांकही 90 अंकांनी वधारत 18,193 अंकांवर कार्यरत होता. यात टायटनचा समभाग सर्वाधिक तेजी राखून होता. निफ्टी मिडकॅप व निफ्टी बँक निर्देशांक तेजीत होता.
निफ्टीत युपीएलचा समभाग 2.66 तेजीसह 790 भावावर होता. हिरो मोटोकॉर्प 2.10 व सिप्ला 1.64 टक्के तेजीत होते. पण कोल इंडियाचा समभाग मात्र 3.47 टक्के इतका घसरणीत होता. सोबत टाटा स्टील 1.69, जेएसडब्ल्यू स्टील 1.43 व हिंडाल्कोचे समभाग 1.33 टक्के घसरणीत होते. सेन्सेक्समध्ये पॉवरग्रिड, एशियन पेंट्स, आयटीसी, टीसीएस, नेस्ले इंडिया, कोटक महिंद्रा बँक व इन्फोसिसचे समभाग अधिक तेजीत होते. तर दुसरीकडे बजाज फिनसर्व्ह, बजाज ऑटो, बजाज फायनान्स, एसबीआय व महिंद्रा आणि महिंद्राचे समभाग मात्र घसरणीत होते.
शुक्रवारी सेन्सेक्स 767 अंकांच्या वाढीसह 60,686.69 अंकांवर बंद झाला होता तर निफ्टीही 229 अंकांच्या तेजीसह 18,102.75 अंकांवर सकारात्मक बंद झाला होता.
जागतिक बाजारांकडे पाहिल्यास आशियाई बाजारात चीनचा शांघाई कम्पोझीट नुकसानीत होता. हाँगकाँगचा हँगसेंग, जपानचा निक्की आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी तेजीसह बंद झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 1.33 टक्के घसरणीसह 81.08 डॉलर प्रति बॅरलवर होते.