सेन्सेक्स 1200 अंकांनी वधारला – एसबीआयचे समभाग तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअर बाजारात सलग सहाव्या दिवशी सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकांनी नवा स्तर गाठण्यात यश मिळवलं आहे. सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 600 अंकांच्या वाढीसह तर निफ्टी निर्देशांक 191 अंकांच्या वाढीसह बंद झाला. ऑटो, धातु, पायाभूत सुविधा आणि आयटी क्षेत्रातल्या समभागांनी तेजी दर्शवल्याचे दिसून आले.
सोमवारी सरतेशेवटी सेन्सेक्स 617 अंकांच्या वाढीसह 51,348.77 अंकांवर आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 191 अंकांच्या वाढीसह 15,115.80 अंकांवर बंद झाला. यात 1689 समभाग तेजीसह आणि 1284 समभाग घसरणीसह बंद झाले. महिंद्रा आणि महिंद्रा, हिंडाल्को इंडस्ट्रिज, टाटा मोटर्स, श्री सिमेंट आणि जेएसडब्ल्यू स्टील यांचे समभाग चांगलीच तेजी दर्शवून बंद झाले. तर दुसरीकडे ब्रिटानिया इंडस्ट्रिज, एचयुएल, कोटक महिंद्रा बँक व बजाज फायनान्स यांचे समभाग घसरणीसह बंद झाले होते.
शेअर बाजार सलग 6 व्या दिवशी तेजीसह सुरू झाला. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स पहिल्यांदाच 51 हजार 400 आणि निफ्टी 15,100 चा विक्रमी स्तर पार करू शकला. ऑटो व बँकिंग क्षेत्रातील समभागांच्या जोरावर शेअर बाजारात तेजीचा कल राहिला. महिंद्रा आणि महिंदाचे समभाग 7 टक्के इतके वाढले होते. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारही तेजीत असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय बाजारात दिसला. दु. 12.15 वा. सेन्सेक्स 568 अंकांच्या वाढीसह 51300.38 अंकांवर व्यवहार करत होता. लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 202.63 लाख कोटी रुपयांवर पोहचले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोमवारी तेजीचा सूर होता. अमेरिकेतून सकारात्मक बातम्यांच्या जोरावर शेअर बाजार सकारात्मकतेकडे झुकत होता. जपानचा निक्की निर्देशांक 510 अंकांनी तेजी दर्शवत होता. तर सोबत चीनचा शांघाई कम्पोझीट 1.06 टक्के तेजीत होता. हाँगकाँगचा हँगसेंग 0.45 टक्के वाढीसह व्यवहार करत होता. फेब्रुवारीत अमेरिकेकडून नवे आर्थिक पॅकेज जाहीर होण्याच्या शक्यतेच्या जोरावर अमेरिकेतील बाजार जोमात दिसत होते. शुक्रवारी विदेशी गुंतवणूकदारांनी 1461.71 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले होते. तर स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1418.65 कोटी रुपयांचे समभाग विक्री केले होते.