प्रतिनिधी / म्हापसा
मूळचे खोर्ली म्हापसा येथील व सध्या शेळपे धुळेर म्हापसा येथे वास्तव्यास असलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता हाजी शेख इब्राहीण् मुसा (92) यांचे गुरुवार दि. 10 रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, पाच पुत्र व चार कन्या असा परिवार आहे.
डिचोली, वास्को, मुळगाव येथील सरकारी हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिले होते. तसेच पर्वरी येथील शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयातही त्यांनी विद्यादान केले होते. म्हापसा शहरातील सामाजिक चळवळीत ते अग्रेसर होते. शिक्षणतज्ञ उल्हास धुरी यांच्या सहयोगाने त्यांनी सामाजिक तथा शैक्षणिक कार्यात सक्रिय योगदान दिलेले आहे. म्हापशातील सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर होते. तसेच क्रिकेट, संगीत, नाटक या क्षेत्रातही ते कार्यरत होते. ते चांगल्यापैकी कव्वाली गायक होते. गोवा व गोव्याबाहेर तसेच दूरदर्शनवर त्यांनी कव्वालीचे कार्यक्रम सादर केले आहेत. गोव्यात मुक्तीपूर्व काळात स्थापन झालेल्या नूतन क्लबचे पदाधिकारी होते. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्यासमवेत मैदानी खेळ खेळण्याचा बहुमानही त्यांना प्राप्त झाला होता. म्हापशातील प्रसिद्ध नाटय़ दिग्दर्शक मनोहर सावरकर यांनी दिग्दर्शित केलेल्या उर्दू नाटकात त्यांनी केलेली भूमिका खूपच गाजली होती.