राकेश टिकैत यांचे उपोषणास्त्र : बंधू नरेश टिकैत यांनी केली आंदोलन मागे घेण्याची घोषणा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या आंदोलनस्थळी गुरुवारी सायंकाळनंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलीस प्रशासनाने शेतकरी नेत्यांना बजावलेल्या नोटिसा, आंदोलन गुंडाळण्यासाठी प्रशासनाने केलेली सुसज्जता, अतिरिक्त सुरक्षा फौजफाटय़ाची जमवाजमव आणि शेतकरी नेत्यांमधील वेगवेगळय़ा भूमिकांच्या पार्श्वभूमीवर आंदोलनस्थळी ‘हायड्रामा’ दिसून आला. त्यातच शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी माध्यमांसमोर येत “कायदे मागे न घेतल्यास येथेच आत्महत्या करेन’’ अशी धमकी दिल्याने वातावरण अधिकच तंग बनले. दुसरीकडे राकेश टिकैत यांचे बंधू नरेश टिकैत यांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केल्याने गोंधळात भर पडली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचे रुप हिंसाचाराच्या घटनेनंतर पूर्णपण पालटले आहे. काही शेतकरी संघटनांनी आंदोलनातून माघार घेतली असली तरी अजूनही शेकडो शेतकरी दिल्लीच्या सीमांवर ठिय्या मांडून आहेत. या आंदोलकांनाही हटविण्यासाठी प्रशासनाने हालचाली वेगवान केल्या आहेत. गुरुवारी येथील मंडपही हटविण्यात आले.
…राकेश टिकैत यांना अश्रू अनावर
भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी माध्यमांसमोर येत गुरुवारी सायंकाळी येथे प्रशासनाकडून आंदोलकांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप केला. तसेच आमचे आंदोलन सुरूच राहील असे स्पष्ट करतानाच नवे कृषी कायदे मागे न घेतल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली. शेतकऱयांना ठार मारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. यावेळी त्यांच्या डोळय़ातून अश्रू ओघळत होते. टिकैत यांनी आत्मसमर्पण करण्यासही नकार दर्शवला.