डॉ. बी. एन. सावंत यांचे प्रतिपादन : वेंगुर्ल्यात शेतीयंत्र दुरुस्ती प्रशिक्षण
प्रतिनिधी / वेंगुर्ले:
आजचे युग हे संगणक युग आहे. या संगणक युगात जसे संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच आधुनिक पद्धतीने शेती करायची झाल्यास यांत्रिकीकरणाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. यासाठीच येथे यापूर्वी व आता शेती यांत्रिकीकरण व यंत्र दुरुस्ती प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षण शिबिरातून चांगले तज्ञ प्रशिक्षक निर्माण होतील व जिल्हय़ात यांत्रिकीकरणाद्वारे मोठय़ा प्रमाणात शेती केल्यास उत्पादन वाढेल, असे प्रतिपादन येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. बी. एन. सावंत यांनी येथे केले.
लुपिन फाऊंडेशन सिंधुदुर्ग, कृषी विभाग, आत्मा व कोकण कृषी विद्यापीठाच्या येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रातर्फे शेती यांत्रिकीकरण व यंत्र दुरुस्ती प्रशिक्षण शिबीर 22 ते 27 फेबुवारी या कालावधित येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. सावंत बोलत होते.
यावेळी वेंगुर्ले कृषी अधिकारी गुंड मॅडम, आत्माचे धनंजय गोलम, लुपिन फाऊंडेशनचे प्रकल्प अधिकारी संतोष कुडतरकर, नारायण परब, फुड सिक्युरिटी आर्मी सिंधुदुर्गचे प्रशिक्षक नीलेश भगत, शंकर सावंत, भालचंद्र परब आदी उपस्थित होते. या प्रशिक्षण शिबिरात फोर व्हिलर टॅक्टर, पॉवर टिलर, रिफर, भात लावणी यंत्र, भात कापणी यंत्र, पॉवर स्प्रे, ग्रास कटर, लाकूड कापणी यंत्र या यंत्रांची प्राथमिक दुरुस्ती प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर सखोल प्रशिक्षणासाठी मास्टर ट्रेनिंग घेण्यात येणार आहे. एक महिन्यापूर्वी अशाच प्रकारचे कृषीयंत्र दुरुस्ती प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सदरच्या प्रशिक्षण शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद लाभल्याने हे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरात 40 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत.
प्रास्ताविक कृषी विभागाच्या गुंड यांनी केले, तर आभार आत्माचे धनंजय गोलम यांनी मानले.