वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप – स्वीडनच्या खेळाडूस सुवर्ण, शैलीला रौप्य, भारताला एकूण 3 पदके
वृत्तसंस्था/ नैरोबी
यू-20 वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या शैली सिंगचे लांब उडीचे ऐतिहासिक सुवर्णपदक अगदी थोडक्यात हुकल्याने तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
17 वर्षीय शैलीने 6.59 मी. लांब उडी घेत वैयक्तिक सर्वोच्च कामगिरी नोंदवली. मात्र सुवर्ण मिळवून देण्यास ते पुरेसे ठरले नाही. केवळ एक सेंटीमीटरने तिचे सुवर्णपदक हुकले. युरोपियन कनिष्ठ चॅम्पियन स्वीडनच्या माया अस्कागने 6.60 मी. लांब उडी घेत सुवर्ण पटकावले. तिसऱया फेरीनंतर शैली आघाडीवर होती. पण स्वीडनच्या 18 वर्षीय अस्कागने चौथ्या फेरीत तिला केवळ एका सेंटीमीटरने मागे टाकले आणि हाच फरक शेवटी निर्णायक ठरला. युक्रेनच्या मारीया होरिएलोव्हाने 6.50 मी. लांब उडी घेत कांस्य मिळविले. या स्पर्धेचा हा शेवटचा दिवस होता.
भारताने आजवरची सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना या स्पर्धेत 2 रौप्य, एक कांस्यपदक मिळविले. याआधीच्या दोन आवृत्त्यामध्ये भारताने एकेक सुवर्णपदक जिंकले होते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण मिळविलेल्या नीरज चोप्राने 2016 मध्ये आणि धावपटू हिमा दासने 2018 मध्ये सुवर्ण मिळविले होते. 4ƒ400 मी. रिले तसेच 10,000 मी. रेस वॉकर अमित खत्री यांनी येथील स्पर्धेत अनुक्रमे कांस्य व रौप्यपदक मिळविले आहे.
शैलीने 6.34 मी. उडी घेत चांगली सुरुवात केली आणि पुढच्या प्रयत्नातही तिने हेच अंतर नोंदवले. तिसऱया प्रयत्नात तिने सर्वोत्तम अंतर नोंदवल्यानंतर पुढच्या दोन प्रयत्नात तिच्याकडून फाऊल झाले आणि शेवटच्या फेरीत तिला 6.60 मी. अंतर पार करता आले नाही. सुवर्ण पटकावत नवा इतिहास निर्माण करण्याची संधी अगदी थोडक्यात हुकल्यामुळे शैली बरीच नाराज झाली होती. भारतीय ऍथलेटिक्समधील नवा तारा या दृष्टीने तिच्याकडे पाहिले जात आहे. तिने शुक्रवारी पात्रता फेरीत 6.40 मी. उडी घेत पहिले स्थान मिळवले होते. झांशीची रहिवासी असलेली शैलीची आई शिवणकाम करते. ती सध्या अंजली बॉबी जॉर्जच्या अकादमीत बेंगळूरमध्ये ट्रेनिंग घेत असून अंजूचे पती बॉबी जॉर्ज यांचे तिला तेथे मार्गदर्शन लाभत आहे. गेल्या जूनमध्ये झालेल्या वरिष्ठांच्या राष्ट्रीय आंतरराज्य चॅम्पियनशिपमध्ये 6.48 मी. उडी घेत तिने जेतेपद मिळविले होते. तिची ही आता दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. यू-18 च्या मानांकनात सध्या ती जागतिक द्वितीय मानांकित असून यू-20 वयोगटातील ती राष्ट्रीय विक्रमधारक आहे.