डॉ.भाटीकर मागणार उसगावातील इमारत व अन्य व्यावहारांची चौकशी
प्रतिनिधी / फोंडा
सहा लाख रुपयांचा किराणा व्यापार देऊन, त्याची बिले करायला नऊ महिने लागतात यावरुन शैलेश नाईक याचा खोटारडेपणा उघड होतो. तिस्क उसगाव येथील रहिवाशी इमारतीसाठी ऑक्युपन्सी म्हणजेच रहिवासी परवाना मिळविण्यासाठी रु. 3 लाख दिल्याचे प्रसार माध्यमासमोर उघडपणे सांगून, त्यांनी आपल्याच तोंडून आपला खोटारडेपणा उघड केलेला आहे. आपल्या विरोधात फसवणुकीची खोटी तक्रार व समाजमाध्यमातून जाहीर बदनामी केल्याबद्दल फोंडय़ातील किराणा व्यापारी शैलेश उर्फ येसू नाईक याच्याविरोधात मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे फोंडय़ातील मगो नेते डॉ. केतन भाटीकर यांनी सांगितले.
व्यापारी शैलेश नाईक यांनी दाखल केलेली फसवणुकीची तक्रार सिद्ध करणारा कुठलाच ठोस पुरावा नाही. उलट शैलेश नाईक यांनी तिस्क उसगाव येथे रहिवासी इमारत प्रकल्प उभारुन सहा ग्राहकांची फसवणूक केल्याचा पुरावा आपल्याकडे असल्याचे डॉ. भाटीकर यांनी सांगितले. चार वर्षांपूर्वी बांधलेली ही इमारत अर्धवट स्थीतीत असताना त्यांनी रहिवासी परवना कसा व कुठून मिळविला, याची चौकशी होणे गरजेचे आहेत. ज्या ग्राहकांनी याठिकाणी सदनिकांसाठी पैसे भरलेले आहेत, त्यांच्यावर इमारत पूर्ण न झाल्याने गेली चार वर्षे भाडय़ाच्या खोलीत राहण्याची वेळ आली आहे. लोकांना बिले न देताच लाखो रुपयांचा किराणा माल विकणाऱया शैलेश नाईक याच्याविरुद्ध करवसुली खात्यात रितसर तक्रार दाखल करणार असल्याचे डॉ. भाटीकर यांनी सांगितले. फोंडय़ातील काही राजकीय लोकांना बळी पडून आपली जाहीर बदनामी केल्याप्रकारणी शैलेश नाईक याच्याविरुद्ध मानहानीचा दावा ठोकणार असल्याची माहिती डॉ. भाटीकर यांनी दिली.