वार्ताहर/ बेडकिहाळ
बेडकिहाळ सर्कल, बोरगाव मार्गावरील शमनेवाडी हद्दीतील एक एकर उसाला शॉर्टसर्किटने आग लागली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना बुधवार 1 रोजी दुपारी 1.30 च्या सुमारास घडली. शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याच्या घटना वारंवार घडत असून हेस्कॉम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर समस्या निकाली काढावी. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱयांना तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱयांसह नागरिकांतून होत आहे.
शमनेवाडी येथील शेतकरी महावीर अण्णासाहेब सोमनखोत यांच्या सर्व्हे क्र. 249/3 क या एक एकर क्षेत्रात उसाची शेती आहे. पुढील काही दिवसांत या उसाची तोड होणार होती. मात्र बुधवारी दुपारी शेताच्या बांधावरून गेलेल्या मुख्य लाईनला शॉर्टसर्किट झाल्याने आगीची ठिणगी उसाच्या शेतात पडली. यामुळे शेताला आग लागली. यावेळी नजीकच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत सदलगा अग्निशमन दलाला पाचारण केले. यानंतर अग्निशमन दल व नागरिकांच्या प्रयत्नाने आग आटोक्मयात आली. केवळ दैव बलवत्तर म्हणून शेताच्या शेजारी असलेल्या लोक वस्ती व जनावरांच्या खोपीपर्यंत आग पसरली नाही. जर आग पसरली असती तर जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला होता.
या क्षेत्रात 2015, 2017 व 2020 या सालात तब्बल तीनवेळा शॉर्टसर्किटनेच आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेकवेळा हेस्कॉम विभागाला कळवून देखील याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. माझ्या शेतातून मुख्य लाईनच्या वाहिन्या गेल्या आहेत. लवकरात लवकर याचा बंदोबस्त करून मला नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी अण्णासाहेब सोमनखोत यांनी केली. घटनास्थळी अधिकारी, ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.