ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. या भागात आणखी काही दहशतवादी लपल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे.
आज सकाळी शोपियांच्या कालबिल भागात संशयास्पद कारवायांबद्दल सुरक्षा एजन्सींना माहिती मिळाली. त्यानंतर या भागात शोधमोहिम हाती घेण्यात आली. दरम्यान, दहशतवादी एका घरात लपल्याचे समजताच सुरक्षा दलांनी त्या घराला घेरले. त्यावेळी सुरक्षा दलांना पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला. या भागात आणखी काही दहशतवादी लपल्याची भीती व्यक्त करण्यात आली असून, परिसराला सुरक्षा दलांनी घेराव घातला आहे.
दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दहशतवादी हल्ल्यांचा धोका लक्षात घेता श्रीनगर शहर आणि लगतच्या भागात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. दहशतवाद्यांच्या नापाक कारवाया उलथवून लावण्यासाठी सुरक्षा दलांकडून शोध मोहीम राबवली जात आहे.