ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यातील तुर्कवानगाम भागात ४४ राष्ट्रीय रायफल्स आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आले. आज पहाटे पाच ते साडेसहा दरम्याम दीड तास ही चकमक सुरू होती.
मागील काही दिवसांपासून शोपियां जिल्ह्यात भारतीय लष्कराची दहशतवादाविरोधात जोरदार कारवाई सुरू आहे. दरम्यान, सोमवारी तुर्कवानगाम भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. त्यानुसार शोधमोहीम हाती घेण्यात आली. लष्कराच्या जवानांनी दहशतवादी लपलेल्या परिसराला वेढा दिला असता दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबाराला भारतीय जवनांनीही चोख प्रत्युत्तर दिले.
या कारवाईत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आले. या कारवाईत स्पेशल ऑपरेशन ग्रुप आणि सीआरपीएफची १७८ बटालियनचाही समावेश होता. या आठवड्यात शोपियां जिल्ह्यातील ही चौथी दहशतवादीविरोधी कारवाई आहे.