ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या शोपियांमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळी चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांना यश आले.
शोपियांमधील अंशीपोरा परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा दल आणि जम्मू पोलिसांनी शुक्रवारी रात्रीपासून शोधमोहीम हाती घेतली. दरम्यान, एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना सरेंडर करण्यास सांगण्यात आले. मात्र, दहशतवाद्यांनी जवान आणि पोलिसांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. भारतीय जवान आणि पोलिसांनी या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास जवान आणि पोलिसांना यश आले. दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.