दिल्ली पोलिसांचे यश ः अफताबच्या वाहनावर तलवारधारींचा हल्ला
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशभरात गाजत असलेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात पोलिसांना महत्त्वाचा पुरावा हाती लागला आहे. श्रद्धाची हत्या आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी उपयोग केलेले शस्त्र पोलिसांना सापडले आहे. त्यामुळे ही निर्घृण हत्या केलेल्या अफताब पुनावाला याच्या विरोधातातील प्रकरण भक्कम होण्यास साहाय्य होणार आहे. हे शस्त्र पुनावाला याच्या सदनिकेतच पोलिसांना सापडले आहे.
पुनावाला याची पॉलिग्राफ चाचणी सोमवारी पुढे सुरू ठेवण्यात आली. त्याला साधारणतः चाळीस प्रश्न विचारण्यात आले, अशी माहिती देण्यात आली. त्याने श्रद्धा वालकर हिची हत्या का आणि कशी केली याचा शोध पोलीस घेत आहेत. या हत्येत त्याला कोणाचे साहाय्य झाले आहे काय याचाही शोध घेतला जात आहे. अत्यंत थंड डोक्याने करण्यात आलेल्या हत्येमुळे पोलिसही चक्रावून गेले असून आतापर्यंत पुनावाला याने कोणताही पश्चाताप व्यक्त केलेला नाही.
कारागृहात बारकाईने लक्ष
या प्रकरणातील आरोप अफताब पुनावाला याच्यावर तिहार कारागृहात बारकाईने लक्ष ठेवण्यात आले आहे. कारागृहात त्याला स्वतंत्र कक्ष देण्यात आला असून दोन अन्य कैद्यांनाही त्याच्यावर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे. पोलीस त्याच्यावर दिवसरात्र पहारा देत असून सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत. केलेल्या कृत्यासंबंधी कोणताही खेद त्याच्या चेहऱयावर किंवा हालचालींमधून पहावयास मिळत नाही. झोपेतही तो अस्वस्थ नसतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.
आत्महत्येचा प्रयत्न करू नये म्हणून
कारागृहात त्याने आत्महत्या करू नये यासाठी त्याच्यावर चोवीस तास लक्ष ठेवण्यात येत आहे. आत्महत्या करण्यास उपयोगी पडेल अशी कोणतीही वस्तू त्याच्या हाती लागू नये यासाठी पोलीस दक्ष आहेत. त्याची पॉलिग्राफ चाचणी शनिवारी पूर्ण होऊ शकली नाही. ती पूर्ण होण्यासाठी आणखी दोन-तीन दिवस लागू शकतात, असे चाचणी करणाऱया दलाचे म्हणणे आहे.
नार्को चाचणी केव्हा ?
अफताब पुनावाला याची नार्को चाचणी केव्हा करण्यात येणार याचे उत्तर अद्याप अस्पष्ट असल्याचे दिसून येते. त्याची पॉलिग्राफ चाचणी पूर्ण झाल्यानंतरच नार्को चाचणी घेण्यात येईल. नार्को चाचणीसाठी न्यायालयाने अनुमती दिली आहे. पॉलिग्राफ चाचणीत त्याने सराईत गुन्हागारालाही लाजवेल अशी उत्तरे दिली आहेत. त्याने या चाचणीचा आधी सराव केला असावा असे त्याच्या प्रतिसादावरून स्पष्ट होते असे पोलिसांचे म्हणणे आहे. गुन्हाविज्ञान शाखेच्या तज्ञांकडून चाचणी होत आहे.
अफताबचे 70 तुकडे करु
अफताबला पॉलिग्राफ चाचणीसाठी आणण्यात आल्यानंतर गुन्हा विज्ञान प्रयोगशाळेच्या बाहेर त्याला घेऊन येणाऱया गाडीवर चार पाच युवकांनी हल्ला केला आहे. त्यांच्या हातात तलवारी होत्या. अफताबचे 70 तुकडे करु अशा घोषणा ते देत होते अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. हल्ला करणाऱयांनी पोलिस व्हॅनचा मागचा दरवाजा उघडला होता. तथापि, पोलिसांनी वेळीच कारवाई केल्याने फारसे काही घडले नाही असे सांगण्यात आले.