ओटवणे / प्रतिनिधी:
विलवडे गावच्या स्नुशा आणि मुंबईत वास्तव्यास असणाऱ्या श्रध्दा दळवी यांच्या सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. मुंबई राजभवन येथे भारत सरकारच्या युवा व खेल मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्र संघटनेच्या महाराष्ट्र व गोवा शाखेच्यावतीने सौ दळवी यांचा हा सन्मान करण्यात आला.
सौ श्रध्दा दळवी या सन १९९० सालापासून विविध क्षेत्रामंध्ये कार्यरत आहेत. त्यानी समाजकार्यासह वैद्यकीय सेवा, साक्षरता, महिला सबलीकरण, स्वच्छता आणि कोविड-१९ प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत भरीव असे प्रबोधनाचे कार्य महाराष्ट्र व बृहन्मुंबई क्षेत्रात सामाजिक बांधिलकीने केलेले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेउन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते श्रद्धा दळवी यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी श्रद्धा दळवी यांना कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हरसिटीची मानद डॉक्टरेट (डी. लिट्) ही पदवी प्राप्त झाल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोष्यारी यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी नेहरू युवा केंद्र संघटनेचे महाराष्ट्र राज्य संचालक प्रकाश कुमार मनुरे, उपसंचालक यशवंत मानखेडकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सौ दळवी याना यापूर्वी त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल मुबई महापौर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. श्रध्दा दळवी या मुंबई महानगरपालिकेचे विशेष कार्यकारी अधिकारी सुभाष दळवी यांच्या पत्नी आहेत तर वेंगुर्ले येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सुनंदा ऊर्फ प्रेमा रामचंद्र कुबल यांच्या कन्या आहेत. तसेच विलवडे येथील माजी उपसभापती विनायक दळवी यांच्या त्या भावजय आहेत.