प्रतिनिधी / वास्को
जेटी मुरगांव हार्बर येथील श्रावणी सोमवार दिंडी उत्सव समितीतर्फे काल सोमवारी वार्षिक श्रावणी सोमवार दिंडी उत्सवानिमित्त वास्कोतील श्री दामोदर चरणी श्रीफळ अर्पण करण्यात आला. दरवर्षी जेटी मुरगांव हार्बर येथील श्रावणी सोमवार दिंडी उत्सव समितीतर्फे शेवटच्या श्रावणी सोमवारी मध्यरात्री दिंडी पथकासमवेत चित्ररथ वास्कोतील श्री दामोदर मंदिरात आल्यावर श्रीचरणी श्रीफळ अर्पण करण्यात येते. मात्र यंदा कोरोना संसर्गामुळे उत्सव समितीने दिंडी अन्य सांस्कृतीक कार्यक्रमांना फाटा दिला. सरकारने जारी केलेल्या सर्व मार्गदर्शकतत्त्वांचे पालन करून सोमवारी संध्याकाळी श्रीफळ दामोदरचरणी अर्पण करण्यात आले. याप्रसंगी नगरविकासमंत्री मिलिंद नाईक, श्री दामोदर भजनी सप्ताह उत्सव समितीचे अध्यक्ष जगदीश दुर्भाटकर, श्रावणी सोमवार दिंडी उत्सव समितीचे रमेश शिवराम नाईक, यशवंत नारायण कुबल, दामोदर नरू नाईक, अनिल काणकोणकर, रवींद्र पिंगे, दामोदर रमेश कवठणकर, राजेश क्षेमचंद्र रेडकर, सुशांत रमेशचंद रेडकर, वृशाल रमेश नाईक, अनिल महादेव तांडेल आदी उपस्थित होते.