शेतकऱयांसह नागरिकांची उडाली धावपळ
प्रतिनिधी/ संगमेश्वर, लांजा
संगमेश्वर, चिपळूण आणि लांजा तालुक्यातील बहुतांश गावात रविवारी सायंकाळी 5 वाजून 07 मिनिटाच्या दरम्यान भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला, परंतु यामध्येही कोठेही नुकसान झालेले नाही. मात्र अचानक जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्याने ग्रामीण भागातील नागरिकांची धावपळ उडाली. 3.9 इतका रिश्टर स्केलचा हा भूकंप होता. कोयना, पाटण, कराड, पोफळी, चिपळूण ही भूकंप जाणवलेली ठिकाणे आहेत.
वारणा खोऱयात तनाली गावच्या पश्चिमेला 12 कि.मी. अंतरावर या भूकंपाचे केंद्रबिदू होते. आता सर्वत्र शेतीचा हंगाम असल्याने शेतकरी शेतीकामात व्यस्त होते. त्यात जिल्हय़ात बहुतांशी भागात रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. पाऊस पडतो की काय, अशी स्थिती होती. अशातच अचानक सायंकाळी 5.07 मिनिटांनी भूकंपाच्या धक्क्याने घरातील खिडक्या तसेच इतर सामान हलल्याचे जाणवले. मात्र या धक्क्याने कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. परंतु भूकंपाच्या धक्क्यामुळे काही प्रमाणात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. रविवारी सुट्टी असल्याने तसेच भात कापणीची कामे करून शेतकरी घरी आल्यामुळे शेतकऱयांनी भूकंपाच्या धक्क्याचा अनुभव घेतला.
लांजातील पूर्व भागात जाणवला भूकंप
लांजा तालुक्यातील पूर्व भागात रविवारी सायंकाळी 5.07 च्या दरम्यान भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. अचानक जमिनीची थरथर व घरांच्या पत्र्यांचा आवाज आल्याने घरातील नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. तर भातकापणीमध्ये मग्न असलेल्या नागरिकांना भूकंपाचा धक्का जाणवला. यानंतर नागरिकांची धावपळ उडाली.