आशिष बडोदेकर यांनी आपली कला केली सादर
प्रतिनिधी/ बेळगाव
संगीताच्या माध्यमातून रसिकांना रिझवणारे एक कलाकार बेळगावमध्ये आले असून ऐतिहासिक स्थळे आणि वृद्धाश्रम यासह विविध ठिकाणी ते आपली कला सादर करत आहेत. आशिष बडोदेकर असे त्यांचे नाव असून, ते मूळचे बेळगावचेच आहेत. 2012 पर्यंत दावणगेरे येथे त्यांनी संगीत शिक्षक म्हणून काम केले. परदेशातही त्यांच्या गाण्यांचे कार्यक्रम झाले. मात्र वडिलांना बरे नसल्याने ते बेळगावला परतले असून, संगीतसेवा करण्याच्या हेतूने ते सध्या विविध ठिकाणी संगीत कला सादर करत आहेत.
त्यांच्या मते बेळगावमध्ये अनेक उत्तम कलाकार आहेत. त्यांच्याप्रमाणेच आपणही इतरांना संगीताचा आनंद द्यावा, असे आशिष यांना वाटते. जीवनात सतत चढ-उतार येत असतात. परंतु सर्व कठीण काळात संगीत आपल्याला साथ देते, असे आशिष म्हणतात.
याच हेतूने ते सध्या ठिकठिकाणी संगीत कला सादर करत आहेत. मंडोळी वॉर टँक येथे नुकतेच त्यांनी आपले गायन सादर केले. सोमवारी सकाळी शांताई वृद्धाश्रमामध्ये विजय मोरे यांनी त्यांना निमंत्रित केले. त्यामुळे सोमवारी कार्यकर्ते संतोष दरेकर यांच्या समवेत ते शांताई वृद्धाश्रमात पोहोचले. तेथे एका शतायुषी आजींनी त्यांच्या समवेत आपले आवडते गीत म्हंटले. अंथरुणावर खिळून असलेल्या 75 वषीय एका आजीनेसुद्धा आश्रमवासियांसमवेत एक गीत सादर केले. शांताईचे व्यवस्थापक नागेश चौगुले यांनी त्यांचा सत्कार केला. अशा पद्धतीने आशिष आपली कला ठिकठिकाणी सादर करणार आहेत.