वेंगुर्ल्याचे सुपुत्र : ‘संजयची चावडी’ सदरातून मालवणी व्यंगचित्रे होणार प्रसिद्ध
वार्ताहर / वेंगुर्ले:
वेंगुर्ल्याचे सुपुत्र संजय गोविंद घोगळे यांची मालवणी भाषेतील व्यंगचित्रे टेक्सास (अमेरिका) येथील ‘महामाझा’ (http://mahamaza.net) या वेबसाईवर प्रसिद्ध करण्यात आली असून यापुढे दर आठवडय़ाला त्यांची मालवणी भाषेतील व्यंगचित्रे ‘संजयची चावडी’ या सदरामध्ये प्रसिद्ध होणार आहेत.
टेक्सास तसेच डल्लास (अमेरिका) येथील शहरातील मूळ महाराष्ट्रीयन नागरिकांनी मराठी साहित्य, संस्कृती आणि कलेचे जतन, शिक्षण आणि प्रसारण करणे तसेच तेथील स्थानिक मराठी कलाकार आणि व्यावसायिक यांना प्रोत्साहन देऊन जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे या हेतूसाठी ‘महामाझा’ ही वेबसाईट सुरु केली असून तिचे उद्घाटन सुप्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांनी ऑनलाईन पद्धतीने 1 जुलै रोजी केले आहे. अमेरिका येथे स्थायिक असलेले रंजन (देवदत्त) नाबर, पौर्णिमा मोंडकर-नाबर, आशुतोष परब आणि दिशा परब तसेच संपूर्ण ‘महामाझा’ टिमने विशेष प्रयत्न केले आहेत. उद्घाटन कार्यक्रमाची जिंगल लेखन मुळचे सिंधुदुर्गचे सुपुत्र मंदार वाडेकर यांनी केले आहे व अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केले असून ऋषिकेश रानडे स्वरबद्ध केले आहे. या वेबसाईटवर ‘संजयची चावडी’ हे मालवणी भाषेतील व्यंगचित्राचे सदर असून यामध्ये वेंगुर्ल्याचे सुपुत्र संजय गोविंद घोगळे यांची व्यंगचित्रे प्रसिद्ध होणार आहेत. घोगळे हे मुंबई येथे शासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. या उपक्रमात सक्रिय सहभागी होण्याची इच्छा असल्यास mahamazausa@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन घोगळे यांनी केले आहे.