प्रतिनिधी / बेळगाव
संपगाव (ता. बैलहोंगल) येथील एका लष्करी जवानाचा आजाराने नागालॅन्डमधील डिमापूर इस्पितळात निधन झाले आहे. या जवानाच्या निधनाने संपगाववर शोककळा पसरली आहे.
विनोद उर्फ आनंद शंकऱयाप्पा उळेगड्डी (वय 35) असे त्या जवानाचे नाव आहे. विनोद हा सध्या आसफ रायफल्समध्ये सेवा बजावत होता. आजारामुळे त्याला नागालॅन्डमधील डिमापूर इस्पितळात दाखल करण्यात आले होते. उपचाराचा उपयोग न होता 30 जून रोजी त्याचा मृत्यू झाला आहे.
गेली 15 वर्षे लष्करी सेवेत असणाऱया विनोदच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे. शनिवारी शोकाकुल वातावरणात व सरकारी इतमामात या जवानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कित्तूरचे आमदार महांतेश दोड्डगौडर, बैलहोंगलचे तहसीलदार बसवराज नागराळ, पोलीस उपअधिक्षक शिवानंद कटगी, मंडल पोलीस निरीक्षक यु. एच. सातेनहळ्ळी आदींसह विविध खात्यांच्या अधिकाऱयांनी पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली वाहिली.