लवकरच आपल्याला अशी वस्त्रे (कपडे) मिळणार आहेत. की ज्यामुळे रोगजंतू आपल्या शरीरात शिरू शकणार नाहीत. सुक्ष्म तंत्रज्ञानाच्या साहाय्याने (नॅनो टेक्नॉलॉजी) अशा कवच प्रदान करणाऱया कपडय़ांची निर्मिती करण्याचे प्रयोग केले जात आहेत. उत्तर प्रदेशातील नोयडा येथे ते सुरू आहे.
रोगप्रतिकारासाठी आपल्याला कुठल्या नव्या प्रकारचे कपडे विकत घ्यावे लागणार नाहीत. आपले नेहमीचेच कपडे रोगप्रतिकारक बनवून दिले जाणार आहेत. या संबंधातील प्राथमिक प्रयोग यशस्वी झाल्याने संशोधकाचा उत्साह द्विगुणित झाला आहे. आपल्या नेहमीच्या कपडय़ावर नॅनो टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने अशी प्रक्रिया केली जाणार आहे की ते निर्जंतुक तर होतीलच शिवाय जंतूचा प्रतिकार करण्याची क्षमताही त्यांच्यात निर्माण होईल. फायबरएक्स नामक स्टार्टअप कंपनीने हे तंत्रज्ञान प्रयोगिक तत्त्वावर विकसित केले आहे. त्याचे व्यापारी तंत्रज्ञानात लवकरच निर्माण होईल आणि असे कपडे देशभरात मिळू लागतील.
कपडय़ांचे ड्राय क्लिनिंग होत असतानाच नॅनो कॅप्सुलच्या साहाय्याने त्यांना रोगप्रतिकारक क्षमताही प्रदान केली जाणार आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे असे कपडे तयार करण्याची कल्पना या कंपनीच्या संचालकांना सुचली. त्वरित प्रयोग सुरू करून त्यांनी मोठे यश प्राप्त केल्याचा दावा केला आहे. या कपडय़ांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे तापमान परिवर्तनाचाही त्यांच्यावर परिणाम होणार नाही.