आमदार सुदिन ढवळीकर यांचे प्रतिपादन
वार्ताहर /मडकई
संस्कृती माणसाला मानवतेच्या धर्माचे पालन करण्यास प्रवृत करते. त्यामुळे संस्कृती व परंपरेतून आलेल्या लोककलांचे जतन हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. युवा पिढीला दिवाळी सणाचे महत्त्व कळावे, यासाठी गेली दहा वर्षे बांदोडा येथे दीपोत्सव साजरा केला जात आहे, असे प्रतिपादन मगो नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी केले.
बांदोडा येथील स्व. भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर बांदोडा पंचायत व माधवराव ढवळीकर ट्रस्ट यांच्या सयुक्त विद्यमाने शनिवारी आयोजित केलेल्या ‘दीपोत्सव 2021’ या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळात ते बोलत होते.
समाजाच्या बदलत्या प्रवाहात युवा पिढी भरकटत जाऊ नये. त्यांना संस्कृती व परंपरेची जाण असावी. श्रीकृष्ण व लक्ष्मी पुजनाचे महत्त्व कळावे. धेंडलोत्सवातून कृषी संस्कृतीची ओळख व्हावी. भाऊबिजेतून भावा-बहिणींचे नाते दृढ व्हावे हा या उत्सवामागील मुख्य हेतू आहे. आपल्या या प्रयत्नातून युवा पिढी घडल्यास उत्सवा साजरा करण्यात खरा आनंद आहे, असे ढवळीकर पुढे म्हणाले.
यावेळी बांदोडाचे सरपंच राजेश नाईक, माधवराव ढवळीकर ट्रस्टचे संचालक मिथील ढवळीकर, सार्वजनीक बांधकाम खात्याचे साहाय्यक अभियंते अरविंद फडते, कवळेचे जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, दामोदर नाईक, माजी जिल्हा पंचायत सदस्य शिवदास गावडे, कवळेचे सरपंच राजेश कवळेकर, बांदोडाच्या उपसरपंच सलोनी गावडे, पंचसदस्य साईशा नाईक, वामन नाईक, वाडी तळावलीचे सरपंच दिलेश गावंकर, दुर्भाट आडपईच्या सरपंच सरोज नाईक, मडकईचे प्रभारी सरपंच विशांत नाईक, राजू भोलू नाईक, मगो केंद्रीय समीतीचे सदस्य अनंत नाईक, महेश पणशीकर, मगोचे हळदोणातील उमेदवार महेश साटलेकर, कुडचडचे उमेदवार आनंद प्रभूदेसाई, राजीव गांधी कला मंदिरचे माजी उपाध्यक्ष अजीत केरकर, शिक्षक जयवंत आडपईकर, तळावलीचे पंचसदस्य हर्षल तळावलीकर तसेच सर्व पंचायतीचे आजी माजी सरपंच, पंचसदस्य व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थीत होते.
पावसाच्या शक्यतेमुळे सांस्कृतीक व संगीताचे कार्यक्रम रद्द करण्यात आले. हे कार्यक्रम येत्या डिसेंबर महिन्यात होणार असल्याची माहिती आमदार सुदिन ढवळीकर यांनी दिली. राजेश नाईक म्हणाले, गेली काही वर्षे बांदोडा पंचायत व माधवराव ढवळीकर ट्रस्ट हा दीपोत्सव साजरा करीत आहे. आमदार ढवळीकर यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य होत आहे. दिव्यांच्या रोषणाईने उजळणारा परिसर मनाला वेगळा आनंद देणार आहे.
गौरेश पाटील व सौ. साईशा नाईक यांच्याहस्ते लक्ष्मी व श्रीकृष्णाची पूजा करण्यात आली. पुरोहीत समीर दाते यांच्या अधिपत्याखाली पूजाविधी पार पडले. त्यांनतर वसूबारस पूजा, भाऊबिज, तुळशी वृदांवन व धेंडल्याची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आमदार सुदिन गट, जिल्हा पंचायत गट व माधवराव ढवळीकर ट्रस्टचे मिथील ढवळीकर तसेच मडकई मतदार संघातील सहा पंचायतींच्या सहा गटांनी धेंडल्याची ओवाळणी केली. स्वागत सलोनी गावडे यांनी केले.