हुमा कुरैशी लवकरच ‘बेल बॉटम’मधून झळकणार
बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरैशी ‘बेल बॉटम’ या चित्रपटात एका अंडरकव्हर एजंटच्या भूमिकेत दिसून येणार आहे. मला काम करत राहण्याची गरज वाटते. महामारीदरम्यान स्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करत राहण्याची गोष्ट मी शिकले आहे. मागील काही वर्षांमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे प्रमाण वाढल्याने कलाकार त्याच्याशी जुळवून घेऊ लागले आहेत असे हुमाने म्हटले आहे.
कलाकार म्हणून अभिनय करणे हे माझे काम आहे. पण चित्रपटगृह बंद राहिल्यास आम्हाला चित्रपटनिर्मिती आणि त्यांच्या प्रदर्शनाची नवी पद्धत शोधावी लागेल असे तिने म्हटले आहे. चित्रपटगृहांमध्ये ‘बेलबॉटम’च्या प्रदर्शनाची प्रतीक्षा करत असलेल्या हुमाकडे आता दोन वेबप्रोजेक्ट आहेत. आर्मी ऑफ द डेडमध्येही ती दिसून येणार आहे. काही कथा ओटीटीसाठी असतात, तर काही चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शनासाठी असतात असे ती सांगते.
महामारीची स्थिती पाहता आता चित्रिकरण एक नवा अनुभव आहे. आम्हाला मेकअप आणि मास्क परिधान करावा लागतो. पूर्वीसारख्या गोष्टी आता आम्ही करू शकत नाही. पण सुरक्षित असलेल्या अन्य पद्धती विकसित कराव्या लागणार आहेत. महामारीची स्थिती लवकर दूर होईल अशी अपेक्षा असल्याचे तिने म्हटले आहे.