वार्ताहर / कळे
कळे ता.पन्हाळा येथील कृषी मंडळ कार्यालय हे बंद राहत असल्याने या परिसरातील सुमारे सत्तर गावातील शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. या कार्यालयातील मंडळ कृषी अधिकारी हे या कार्यालयात हजर राहत नसल्याने या कार्यालयाला कोणी वालीच नसल्याचे दिसुन येत आहे. कळे येथे परिसरातील सत्तर गावासाठी कृषी विभागाचे कृषी मंडळ अधिकारी कार्यालय आहे. या कार्यालयात एक कृषी मंडळ अधिकारी. दोन सुपरवायजर. व बारा कृषी सहाय्यकांची नेमणूक आहे. शेतकऱ्यांना शासनाच्या कृषी योजनांची माहिती देणे. त्या योजना प्रभावीपणे राबविणे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे. हे काम हे कार्यालय करते.
परिसरातील शेतकरी या कार्यालयात कामानिमित्त जात असताना कार्यालयीन वेळेत हे कार्यालय बंद असल्याने शेतकऱ्यांना परत माघारी फिरावे लागत आहे. तसेच मंडळ कृषी अधिकारी येत नसल्याने शेतकऱ्यांची कामे खोळबंली आहेत या कार्यालयात मंडळ कृषी अधिकारीच हजर राहत नसल्याने गैरसोय टाळण्यासाठी तरी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.